Mon, Mar 25, 2019 18:11होमपेज › Nashik › दोषत्व सिद्ध; वेतनवाढ रोखण्यावरच भागविणार

दोषत्व सिद्ध; वेतनवाढ रोखण्यावरच भागविणार

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

बदल्यांमध्ये अपंग परिचरांवर अन्याय केला, शिवाय इतिवृत्त बदलण्याची गंभीर बाब विभागीय खाते चौकशीत सिद्ध झाल्यानंतरही सिन्नर पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी सदाशिव बारगळ तसेच सामान्य प्रशासन विभागातील कल्पना पवार यांना केवळ वेतनवाढ रोखण्याचीच शिक्षा देण्याचा विचार प्रशासन करीत असल्याने यात नेमके कोणाचे आणि काय हित दडले आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणात बदली करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.

बदली प्रक्रियेत अपंग कर्मचार्‍यांवर अन्याय करण्यात आल्याची तक्रार पुढे आली होती. संबंधित कर्मचार्‍यांचा संवर्गच बदलण्यात येऊन इतिवृत्तही बदलण्यात आले होते. विशेष म्हणजे, एका महिला परिचरावरही अन्याय झाल्याने प्रश्‍न थेट स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आल्यानंतर गदारोळ झाला होता. अपंग आयुक्तांकडे तक्रार केली तेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. विभागीय खाते चौकशी पूर्ण झाली असून, त्यात सिन्नर पंचायत समितीचे सहायक प्रशासक अधिकारी तसेच कल्पना पवार हे दोषी आढळले आहेत. त्यांच्याविरोधात केलेले आरोप सिद्ध झाले असून, त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असला तरी या दोघाही कर्मचार्‍यांना केवळ वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्याचा विचार प्रशासन करीत असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे, परिचरांवर अन्याय केल्यानंतरही केवळ संबंधितांना देण्यात येणारी शिक्षा म्हणजे केवळ तोंडदेखलेपणा असल्याचे अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याच तक्रारीमुळे बारगळ यांची बदली करण्यात आली तेव्हा त्यांनी न्यायालयात धाव घेऊन प्रशासनालाच आव्हान दिले होते. तरीही प्रशासन त्यांना जुजबी शिक्षा ठोठावून अभय देण्याच्या विचारात असल्याने यात नेमके कोणाचे आणि काय हित दडले आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.