Sun, Jul 21, 2019 05:46होमपेज › Nashik › शाहीर शंतनू कांबळे अनंतात विलीन

शाहीर शंतनू कांबळे अनंतात विलीन

Published On: Jun 14 2018 3:21PM | Last Updated: Jun 14 2018 3:21PMनाशिक : प्रतिनिधी

‘तुझ्या बोलण्याचं ऐसं, ‘दलिता रं हल्ला बोलना’, ‘समतेच्या वाटेनं खणकावीत पैंजण यावं, सारी बंधनं तोडीत यावं’,‘आठवा भगत सिंग कसा कसा घडला’, ‘बाजार बाजार दडलाय रं’, झेंडावंदन करून जा’, ‘पळू नका दुनिया सारी बदला’, ‘बाळ रडलं रडलं बाळ उपाशी झोपलं’, अशा क्रांतिक्रारी गीतांचा जागर करीत विद्रोही शाहीर शंतनू कांबळे यांच्यावर गुरुवारी (दि.14) नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दि.17 रोजी नशिक-पुणे रोडवरील डॉ. आंबेडकर नगर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

‘शंतनू कांबळे अमर रहे’, कॉम्रेड शंतनू कांबळे जिंदाबाद’, शंतनू कांबळे लाल सलाम- जय भीम’ आदी घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नाशिक-पुणेरोड, येथून सकाळी 10.30 वाजता अंत्ययात्रा निघाली. अमरधाममध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी शंतनू यांनी लिहिलेली समतेची गाणी गात अभिवादन केले. 2005 मध्ये शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. रायपूर येथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर शंतनूने 100 दिवस तुरुंगवास भोगला. मात्र, तपासाअंती न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अंथरुणाला खिळून होते. अखेर आजाराशी लढता लढताच त्यांची बुधवारी (दि.13) प्राणज्योत मालवली. शाहिरीच्या माध्यमातून जनसामान्यांत क्रांतीची मशाल पेटवणारे, लोकशाहीर शंतनू कांबळे यांच्या निधनाने चळवळीचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.