Sat, Apr 20, 2019 18:37होमपेज › Nashik › भाजपा आमदारांना पुन्हा मनपा आयुक्‍तांचा दणका

भाजपा आमदारांना पुन्हा मनपा आयुक्‍तांचा दणका

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 21 2018 11:19PMनाशिक : प्रतिनिधी

आमदार निधीतून महापालिका हद्दीत होणारी विकासकामे ही महापालिका यंत्रणेमार्फतच केली जातील. इतर कुणाही एजन्सीला त्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असा पुनरुच्चार मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी करत भाजपाच्या तिन्ही आमदारांना पुन्हा दणका दिला.  

आमदार निधीच्या माध्यमातून होणार्‍या विकासकामांवर आयुक्‍तांनी यापूर्वीच हरकत घेतली आहे. तसेच अशा प्रकारचे प्रस्ताव इतर विभागांकडून आल्यास त्यास मान्यता देऊ नये, अशा प्रकारचे आदेश आयुक्‍त मुंढे यांनी खातेप्रमुखांना दिले होते. यामुळे आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे तसेच आमदार सीमा हिरे यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. परंतु, त्यातून काहीच निष्पन्‍न झाले नाही.

फुलेनगर येथील ड्रेनेजसाठी आमदार सानप यांनी आणलेला निधी मनपाने वर्ग करून घेतला होता. यामुळे आमदार सानप यांनी नाराजी व्यक्‍त केली होती. याबाबत विचारले असता आमदार निधीतून कोणतेही काम करत असताना त्यास त्या-त्या प्राधिकरणाकडून ना हरकत घ्यायची असते. मनपा हद्दीत काम होत असेल तर भविष्यात त्याची देखभाल दुरुस्ती ही मनपालाच पाहावी लागते. यामुळे संबंधित कामे इतर विभाग वा एजन्सीकडून करून घेण्यास मनपा एनओसी देणार नाही. ती कामे मनपा यंत्रणेमार्फतचकेली जातील, असे मुंढे यांनी सांगितले. 

जुने नाशिक क्‍लस्टर डेव्हलपमेंटसंदर्भात शासनाकडून दोन दिवसांपूर्वीच पत्र प्राप्‍त झाले आहे. त्यानुसार इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीबाबतचा अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. क्‍लस्टर डेव्हलपमेंटअंतर्गत कोणत्या बाबी येऊ शकतात आणि त्यामुळे त्याचे दीर्घकालीन चांगले वाईट कोणते परिणाम होऊ शकतात याचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.