Tue, Apr 23, 2019 14:18होमपेज › Nashik › मुंढेंविरोधातील अविश्‍वास बारगळला

मुंढेंविरोधातील अविश्‍वास बारगळला

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Aug 31 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंवरील अविश्‍वासाचे नाट्य अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शमले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने महापौर रंजना भानसी यांनी अविश्‍वास ठराव मागे घेण्यासह विशेष महासभादेखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मनपातील सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी आणि नगरसेवक तोंडघशी पडल्याचे आणि मुंढे हीरो ठरल्याचे चित्र शुक्रवारी (दि.31) पाहावयास मिळाले. अविश्‍वास ठरावासाठी विरोधकांना आवाहन करणार्‍या भाजपानेच रणांगणातून काढता पाय घेतल्याने विरोधकांनी भाजपावर ‘पळपुटे’ आणि ‘नौटंकी करणारा पक्ष’ अशा शब्दांत निशाणा साधला आहे. 

मोकळे भूखंड, शेतजमीन आणि नवीन मिळकतींवर लागू केलेली    करयोग्य मुल्य दरवाढ रद्द करावी, यासाठी भाजपाने 27 जुलै रोजी अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी पत्र सादर केले होते. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि.1 सप्टेंबर) विशेष महासभा आयोजित केली होती. भाजपाच्या या भूमिकेला मनसेने जाहीर पाठिंबा दिला होता. तर काँग्रेस आणि शिवसेनेने करवाढ रद्द करण्याबाबत आम्ही नाशिककरांबरोबर असून, सभागृहातच काय तो योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली होती. यामुळे अविश्‍वास ठराव मंजूर होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, शिवसेनेने व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी (दि.30) महापौरांना दूरध्वनी आला आणि त्यांनी आयुक्तांवरील अविश्‍वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून ङ्गरामायणफवरील सर्व खलबते पाण्यात गेली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वार्ता वार्‍यासारखी पसरल्याने भाजपाच्या नगरसेवकांनी याबाबत एकमेकांकडे दूरध्वनी करून चौकशी केली आणि बातमीची खातरजमा केली. वृत्त खरे असल्याचे समजताच अनेकांनी नाराजी व्यक्त करत ङ्गरामायणफला येण्याऐवजी घरी बसणेच पसंत केले. शुक्रवारी (दि.31) महापालिका आणि ङ्गरामायणफकडे पदाधिकारी आणि नगरसेवक फिरकलेदेखील नाहीत. या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली. करवाढीसाठी अविश्‍वास आणणारा भाजपा पळपुटा आणि नौटंकी करणारा पक्ष असून, सत्ता चालविता येत नसेल तर पदाधिकारी आणि नगरसेवकांनी राजीनामे देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने केली आहे. 
दरम्यान, मुंढे यांच्यावर येणार्‍या अविश्‍वास ठरावाच्या विरोधात ङ्गआम्ही नाशिककरफ या झेंड्याखाली काही सामाजिक संघटनांनी एकत्रित येत ङ्गवॉक फॉर कमिशनरफ मोर्चा काढला. अनेक संस्था आणि मंडळांनी भाजपाला पाठिंबा देऊनही ङ्गआम्ही नाशिककरफच सरस ठरल्याने भाजपाच्या पदाधिकार्‍यांना माना खाली घालाव्या लागल्या. 

विरोधकांच्या भीतीने सभाच रद्द 

महासभेच्या आदल्या दिवशीच विरोधकांकडून भाजपा पदाधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणावर टीका आणि आरोपांचा सामना सहन करावा लागला. महासभेत विरोधकांकडून आणखी मानहानी वा बदनामी होऊ नये, या भीतीने महापौर रंजना भानसी यांनी विशेष महासभाच रद्द करून टाकली. एकदा बोलावलेली महासभा रद्द करता येते का, यावर बराच काळ काथ्याकूट झाला. शेवटी महासभा बोलवण्याचा अधिकार महापौरांना आहे तसा सभा रद्द करण्याचादेखील अधिकार असल्यावर एकमत झाल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीच्या चौदा सदस्यांनी आज होणारी सभा रद्द करण्याबाबत आपल्याकडे पत्र दिल्याचे महापौरांनी नमूद करीत महासभा रद्द केल्याचे सांगितले. परंतु, विरोधकांना घाबरूनच भाजपाने महासभेतूनही काढता पाय घेतल्याचे बोलले जात होते. 
वरिष्ठांना माहितीच नाही 

अविश्‍वास ठराव दाखल करण्याबाबत शहराध्यक्ष, महापौरांसह पदाधिकार्‍यांनी पक्षश्रेष्ठींना माहितीच दिली नसल्याचे समोर आले आहे. यामुळेच पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकार्‍यांना धडा शिकविण्यासाठीच पुन्हा मुंढे यांची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे. एकूणच कारभाराविषयी शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांना अनेकदा दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद आढळला. तर आमदार देवयानी फरांदे यांना प्रतिक्रिया विचारली असता, ङ्गमला या प्रकरणात ओढू नकाफ, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी अधिक बोलणे टाळले. आमदार सीमा हिरे यांनी या सर्व प्रकरणात आम्हाला कोणीही माहिती दिली नाही. सत्ता असताना अविश्‍वास ठराव दाखल न करता मुख्यमंत्र्यांना सांगून मार्ग काढता आला असता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. करवाढ रद्द करण्याची आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.