Fri, Jul 19, 2019 13:25होमपेज › Nashik › महारांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन 

महारांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन 

Published On: Dec 16 2017 1:46AM | Last Updated: Dec 15 2017 11:48PM

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी 

कोणत्याही कार्यक्रमासाठी अनेक दिवस नियोजन करावे लागते. मात्र, जागतिक विक्रमासाठी धर्माधिकारी दाम्पत्याने एका दिवसात महारांगोळी रेखाटली आणि भारतीय संस्कृती असलेल्या रांगोळीतून अवयवदानाचा संदेश दिला, असे प्रतिपादन चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी प्रसाद मंगल कार्यालयात केले. 

आसावरी धर्माधिकारी आणि सतीश धर्माधिकारी यांनी अवयवदान आणि रक्तदानाचा प्रसार करण्यासाठी रेखाटलेल्या महारांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सावंत बोलत होते. यावेळी ऋषिकेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे, अवयवदानासाठी पदयात्रा करणारे सुनील देशपांडे, प्रसाद मंगल कार्यालयाचे संचालक जगदीश जोशी, महेश हिरे आदी उपस्थित होते. जागतिक विक्रम करण्याचा मानस असणारी 50 फूट रुंद व 50 फूट लांब आकाराची रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीची ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल’ आणि ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल’मध्ये नोंद होणार आहे. हे प्रदर्शन 20 वर्षांच्या मेहनतीचे फळ असल्याचे धर्माधिकारी दाम्पत्याने यावेळी सांगितले. शुक्रवारी (दि.15) सकाळी 9 वाजता रांगोळी काढण्यास सुरुवात करण्यात आली व दुपारी 3 वाजता रांगोळी पूर्ण झाल्याचे आसावरी धर्माधिकारी यांनी सांगितले. यासाठी एक हजार किलो रंग आणि 200 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी रांगोळी प्रदर्शनासोबत येथे जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहे. 17 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत प्रदर्शन खुले  राहणार आहे.