होमपेज › Nashik › शासनाकडून मका खरेदी कागदावर !

शासनाकडून मका खरेदी कागदावर !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

तब्बल पावणेदोन महिन्यापूर्वी मका खरेदीसाठी पुरवठा विभागाने एकूण 36 केंद्रांना परवानगी दिली असताना त्यातील केवळ पाचच केंद्रे कार्यन्वित झाली आहेत. या केंद्रांनी अद्यापपर्यंत खरेदी सुरू केली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसरीकडे तालुक्याला गोदामांची वानवा असल्याने खरेदी केलेल्या मका साठवणुकीबाबत प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. 

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी भरड धान्य खरेदीअंतर्गत मका खरेदीला परवानगी दिली. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच मका उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सरकारच्या सूचनेनुसार पुरवठा विभागाने 7 ऑक्टोबरला मका खरेदी सुुरू करण्याचे निर्देश दिले होते. आदिवासी तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ, तर बिगर आदिवासी तालुक्यात जिल्हा फेडरेशन मार्केटिंगमार्फत खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या पावणेदोन महिन्यात केवळ पाच केंद्रे सुरू करण्यापलीकडे कोणतीच कारवाई झालेली नाही. 

जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 36 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात सात आदिवासी तालुक्यांत 26 तर आठ बिगर आदिवासी तालुक्यांत 10 केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत मात्र, कळवण तालुक्यातील दळवट, तिरळ, विसापूर, जमधर तर सटाण्यातील मुल्हेर हीच केंद्रे सुरू झाली आहेत. या पाचही केंद्रांपैकी एकाही ठिकाणी मका खरेदी होत नसल्याची बाब उजेडात आली आहे. 
तालुक्यांना एकीकडे मका खरेदी केंद्रे कार्यन्वित झाली नसताना दुसरीकडे प्रशासन मात्र कोंडीत सापडले आहे. कारण तालुकास्तरावर गोदामांची साठवणूक क्षमता मर्यादित असल्याने खरेदी केलेला मका ठेवायचा कोठे असा प्रश्‍न अधिकार्‍यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळेच .शासनाकडून होत नसलेली  मका खरेदी व साठवणुकीवरून जिल्ह्यात सध्या पेच उभा राहिलेला असताना मका विक्री होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.