होमपेज › Nashik › अंत्यसंस्कार योजनेतही ‘टाळूवरचे लोणी’

अंत्यसंस्कार योजनेतही ‘टाळूवरचे लोणी’

Published On: Dec 23 2017 2:10AM | Last Updated: Dec 22 2017 11:26PM

बुकमार्क करा

नाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

मनपाच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेंंतर्गत निविदेबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जवळच्या काही ठेकेदारांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी आरोग्य विभागाने आधीची निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. यामुळे आता खास ठेकेदारांसाठी पुन्हा निविदा बोलविण्यात येणार असल्याने आरोग्य विभागाची लपवाछपवी समोर आली आहे.

मनपाची मोफत अंत्यसंस्कार योजना हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. ठेका मिळविण्यासाठी दोन ठेकेदारांमधील वादही यापूर्वी गाजलेला आहे. एवढेच नव्हे तर ठेका कुणाला द्यायचा यावरून स्थायी समितीच्या सभेत सदस्यांमध्येच वाद निर्माण झाला होता. ठेक्यातील अटी-शर्तीनुसार ठेकेदाराकडून मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे लाकूड, गोवर्‍या, रॉकेल देणे अपेक्षित असते. असे असताना ठेकेदाराकडून मात्र त्यातही कात्री मारून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार केला जातो. याबाबत आरोग्य विभागाकडे अनेकदा तक्रारी येऊनही त्याकडे अधिकार्‍यांनी केवळ ठेकेदाराच्या प्रेमापोटीच दुर्लक्ष केले आहे. आताही आपल्या मर्जीतील ठेकेदारास ठेका मिळावा, यासाठी निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार आहे. वास्तविक आधीच्या निविदेत तीन ठेकेदारांचा सहभाग राहिलेला आहे. नियमानुसार तीन वा तीनपेक्षा अधिक निविदा आल्यास अशा प्रकारची निविदा उघडून त्यात कमीत कमी दर असणार्‍या निविदाधारकास पात्र समजले जाते. असे असताना आरोग्य विभागाने मात्र नियमालाच पायदळी तुडवत आधीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातला आहे. निविदा प्रक्रियेत अपेक्षित बदल करण्यासाठी शुक्रवारी (दि.22) सायंकाळी  आरोग्य विभागात काही ठेकेदारांनी तळ ठोकला होता.