होमपेज › Nashik › समृद्धीसाठी उद्यापासून सक्तीने जमीन खरेदी

समृद्धीसाठी उद्यापासून सक्तीने जमीन खरेदी

Published On: Sep 02 2018 1:15AM | Last Updated: Sep 02 2018 12:31AMनाशिक : प्रतिनिधी

जमीन खरेदी प्रक्रियेच्या सर्व्हरला अडथळा निर्माण झाल्याने समृद्धीसाठीच्या जमिनीचे सक्तीने करावयाचे भूसंपादन सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. सिन्नर व इगतपुरीमधील 25 गटांमध्ये थेट खरेदी केली जाणार असून, त्यानंतर जिल्हा प्रशासन अंतिम अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. 

मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्प जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी अशा दोन तालुक्यांमधून समृद्धी प्रकल्प जात आहे. प्रकल्पासाठी प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंत एकूण खासगी 1108.19 हेक्टर क्षेत्रापैकी 917.49 हेक्टर जमिनीचे थेट खरेदीद्वारे अधिग्रहण केले आहे. दोन्ही तालुक्यांत 1827 खरेदी झाल्या असून, 6 हजार 300 शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली आहे. दरम्यान, जमिनीच्या मोबदल्यापोटी नुकसानभरपाई म्हणून पीडित शेतकर्‍यांना एकूण 995 कोटी एक लाख 35 हजार 362 रुपये देण्यात आले आहे. 

दोन्ही तालुक्यांत मिळून आजही 213 हेक्टर क्षेत्राचे अधिग्रहण करणे बाकी आहे. त्यातील 190.70 हेक्टर क्षेत्र हे खासगी आहे. दरम्यान, घरगुती वाद, भाऊबंदकी तसेच न्यायालयातील वाद अशा विविध कारणांमुळे हे संपादन रखडले आहे. यापुढे हे क्षेत्र सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 1) सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील 25 गटांचे सुमारे 15 हेक्टरचे क्षेत्र थेट खरेदीद्वारे अधिग्रहण केले जाणार होते. मात्र, सर्व्हरला अडथळा निर्माण झाल्याने ते रखडले. त्यामुळे ही खरेदी सोमवारपर्यंत (दि.3) पुढे ढकलण्यात आली आहे. या गटांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी अंतिम अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून (दि. 4) रखडलेल्या गटांची खरेदी ही सक्तीने भूसंपादन कायद्यानुसार केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.