होमपेज › Nashik › समृद्धी महामार्गासाठी आता सक्तीने भूसंपादन 

समृद्धी महामार्गासाठी आता सक्तीने भूसंपादन 

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Aug 31 2018 11:04PMनाशिक : प्रतिनिधी 

मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पासाठी जिल्ह्यातील 85 टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. उर्वरित 15 टक्के जमिनीचे आता भू-संपादन कायद्याने केले जाणार आहे. त्यामुळे जमीन न दिलेल्या शेतकर्‍यांना 25 टक्के नुकसान सोसावे लागणार आहे. 

जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी अशा दोन तालुक्यांमधून समृद्धी प्रकल्प जात आहे. प्रकल्पासाठीचे 85 टक्के जमिनीचे अधिग्रहण प्रशासनाने पूर्ण केले आहे. आजही 213 हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. दरम्यान, थेट खरेदीद्वारे जमीन देण्यासाठी प्रशासनाने 31 ऑगस्ट ही अखेरची मुदत दिली होती. 1 सप्टेंबरपासून सक्तीने भू-संपादनाचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

त्यानुसार 213 हेक्टर क्षेत्राचे सक्तीने भू-संपादनाचे काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. समृद्धी प्रकल्पासाठी जिल्ह्यातील 1280 हेक्टर क्षेत्र संपादित करायचे आहे. त्यापैकी 1108 हेक्टर क्षेत्र हे खासगी तर उर्वरित सरकारी आहे. आतापर्यंत दोन्ही मिळून 85 टक्के क्षेत्र अधिग्रहणाचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. परंतु, उर्वरित क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग मोठा आहे. यामध्ये घरगुती वाद, भाऊबंदकी तसेच न्यायालयीन प्रकरणे अशा विविध कारणांमुळे हे संपादन रखडले आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी आता सक्तीने भू-संपादन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परिणामी बाधित शेतकर्‍यांना आता नुकसानभरपाईच्या केवळ चारपट मोबदलाच दिला जाणार आहे.