होमपेज › Nashik › अन्न, औषध प्रशासनाकडून २५ हॉटेलांना नोटिसा 

अन्न, औषध प्रशासनाकडून २५ हॉटेलांना नोटिसा 

Published On: Dec 16 2017 1:46AM | Last Updated: Dec 15 2017 11:51PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल्सचा व्यवसाय तेजीत असतो. परंतु हॉटेल्समधून  सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध विभागाकडून गेल्या आठवड्यापासून शहर तसेच जिल्ह्यातील हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत 35 हॉटेल्सची तपासणी करत सुमारे 25 हॉटेल्समालकांना सुधार, तर आठ जणांना विनापरवाना हॉटेल व्यवसाय सुरू केल्याबद्दल नोटिसा बजाविण्यात आल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी यांनी दिली.

सरत्या वर्षाला निरोप अन् नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच नाताळ साजरा करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून विविध प्रकारची तयारी सुरू आहे. या कालावधीत हॉटेल्समधून असुरक्षित अन्न मिळण्याचीदेखील शक्यता असते. गत महिन्यात अन्नातून विषबाधा होऊन एक जणाचा मृत्यू, तर सुमारे 200 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची घटना दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे गत महिन्यात घडल्याने स्वयंपाकातील अन्नामध्ये होणार्‍या रासायनिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे केटरर्सबरोबर आता हॉटेल्सदेखील अन्न आणि औषध प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.

डिसेंबरअखेरीस आणि नववर्षानिमित्त हॉटेलिंग दरवर्षी जोरात असते. परंतु अनेक हॉटेल्स बोहरून चकाचक असूनही स्वयंपाकघर आणि आजूबाजूचा परिसर मात्र अस्वच्छ असतो. त्याचबरोबर विविध हॉटेल्समधील कुकदेखील त्याच ठिकाणी धूम्रपानदेखील करतात. स्वयंपाकघर आणि बाजूचा परिसर अस्वच्छ राहिल्याने त्याठिकाणी उंदीर आणि झुरळांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अन्न असुरक्षित होण्याच्या प्रमाणात वाढ होऊन त्याचा खवय्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अन्न, औषध प्रशासनाकडून दरवर्षी छोटे-मोठे हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रीचे हातगाडे तसेच बेकरी तपासणी मोहीम हाती घेतली जाते. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेली तपासणी मोहीम 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.