Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Nashik › वर्षभरात अवघ्या तेराशे विद्यार्थ्यांना रोजगार 

वर्षभरात अवघ्या तेराशे विद्यार्थ्यांना रोजगार 

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 11:15PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडून वर्षभरात सात रोजगार मेळावे भरविण्यात आले असून, त्यामध्ये जिल्ह्यातील एक हजार 372 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. येत्या 10 ते 12 डिसेंबरदरम्यान भव्य रोजगार मेळावा भरविण्याची तयारी केली असून, त्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात 21 हजार 137 विद्यार्थ्यांनी रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडे नावनोंदणी केली. त्या तुलनेत रोजगार मिळण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चित्र पाहायला मिळते.

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना अमलात आणल्या आहेत. पदवी धारण केल्यानंतर रोजगार मिळावा यासाठी दहावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नावनोंदणी करतात. 1 जानेवारी 2017 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडे शहर व जिल्ह्यातील 21 हजार 137 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली. विद्यार्थ्यांच्या हातांना काम मिळावे यासाठी केंद्राकडून सात रोजगार मेळावे भरविण्यात आले. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय, बीवायके महाविद्यालय, सिन्नर आयटीआय, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, अंबड इंजिनिअरिंग क्लस्टर, मविप्रचे रावसाहेब थोरात सभागृह व देवळा येथील डॉ. डी. एस. आहेर महाविद्यालय या ठिकाणी रोजगार मेळावे भरविण्यात आले होते. त्यामध्ये चार हजार 855 विद्यार्थ्यांनी रोजगारासाठी अर्ज केले होते. त्यापैकी एक हजार 372 विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्राकडून सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या ठिकाणी 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.