Sun, Feb 23, 2020 03:11होमपेज › Nashik › आणीबाणीची अंमलबजावणी अपरिहार्यतेतून

आणीबाणीची अंमलबजावणी अपरिहार्यतेतून

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:57PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सन 1975 मध्ये देशात इंदिरा गांधींना अपरिहार्यतेतून आणीबाणीची अंमलबजावणी करावी लागली. त्या घटनेला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संदर्भांचे अनेक पदर होते. आणीबाणीची मीमांसा करताना हे संदर्भ पडताळून पाहायला हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ग्रंथालय सप्ताहाचा समारोप गुरुवारी केतकर यांच्या ‘इंदिरापर्व’ विषयावरील व्याख्यानाने झाला. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानात केतकर यांनी अनेक दाखले देत इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविले. ते म्हणाले, गांधी हुकूमशाही प्रवृत्तीच्या असत्या व त्यांना आणीबाणी लादायचीच असती तर त्या ती सन 1972 मध्येच लादू शकत होत्या; मात्र पुढील तीन वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलली. अरब राष्ट्रांमध्ये युद्ध होऊन खनिज तेलाचे भाव 65 टक्क्यांनी वाढले. 1962 ते 1971 या नऊ वर्षांत देशावर तीन युद्धांचा बोजा पडलेला होता. विरोधक थेट सैन्य व पोलिसांना असहकार पुकारण्याची भाषा करीत होते. दुसरीकडे अमेरिकेकडून भारतावर प्रचंड दबाव टाकण्याचे काम सुरू होते; मात्र इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता रशियाशी करार केला होता.  या संपूर्ण पार्श्‍वभूमीवर गांधींना आणीबाणी लादावी लागली. आणीबाणीला प्रारंभीचे 6 महिने पाठिंबा लाभला, नंतर विरोध सुरू झाला. गांधी यांचे धोरण दिल्लीत बसून ठरत नव्हते, तर त्याला आंतरराष्ट्रीय पदर होते; मात्र ते लक्षात न घेता, साहित्यिक-पत्रकारांनीही त्यांच्यावर आणीबाणीवरून टीका करीत असहिष्णुताच दाखवली.  असे केतकरम्हणाले.कार्यकारी मंडळ सदस्य बी. जी. वाघ यांनी प्रास्ताविक केले. वसंत खैरनार यांनी परिचय करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले,