Thu, Dec 12, 2019 09:14होमपेज › Nashik › नाशिक जिल्हा बँक अध्यक्षपद निवडणूक : दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ

नाशिक जिल्हा बँक अध्यक्षपद निवडणूक : दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 23 2017 10:33PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी केदा आहेर यांची निवड झाली खरी, पण त्यात ज्येष्ठ संचालक माणिक कोकाटे आणि परवेझ कोकणी यांच्यावर अखेरच्या क्षणी आहेरांनी केलेली मात चर्चेचा विषय ठरली आहे. 

कोकाटे आणि कोकणी यांनी सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी दावा केल्याने या दोघांमध्येच स्पर्धा निर्माण झाली होती. आहेर चर्चेत असले तरी त्यांच्या हालचाली मात्र सुप्‍त होत्या. तर कोकाटे आणि कोकणी यांनी पक्षाच्या म्हणजे भाजपाच्या वरिष्ठांचा शब्द पदरात पाडून घेण्यासाठी नागपूरमध्ये तळ ठोकला होता. कोकणी यांची अध्यक्षपदाची कारकीर्द मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने त्यांचा पत्ता कट झाला. कोकणी अध्यक्ष होणार नाहीत, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिला खरा, पण नेमके एकाचे नावही सूचविले गेले नाही. ही सारी जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली. तीन दिवसांपर्यंत कोकाटे यांचे नाव आघाडीवर होते. दुसरीकडे कोकणी आणि कोकाटे यांच्या हालचालींवर नजर ठेवून असलेल्या आहेर यांनी नागपूर गाठून पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, भेट होऊ शकली नाही. त्यानंतर मात्र, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतली. त्यामुळे कोकाटे यांच्याबरोबर आहेर यांचेही नाव चर्चेत आले. निवडणुकीच्या दिवशीच पालकमंत्र्यांनी दोघांपैकी एकाची निवड करण्याचा निरोप संचालकांना धाडला. माघार घ्यायला दोघेही तयार नव्हते.

दरम्यानच्या काळात रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा बँकेची चौकशी होणार असल्याची वृत्ते प्रसारित झाल्याने सजग झालेल्या कोकाटे यांनी संबंधितांकडून रिझर्व्ह बँकेचा मेल मिळविला. लोकसभेची निवडणूक लढायची असल्याने बँक बरखास्त झालीच, तर लोकांसमोर कोणत्या तोंडाने मतं मागायला जाणार, असा विचार कोकाटे यांनी ऐनवेळी करून थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आहेर यांच्या मार्गातील अडथळा दूर झाला. दुसरीकडे 13 संचालकांना कोकाटे अथवा आहेर यांच्यापैकी कोणीही अध्यक्षपदी विराजमान झालेला चालणार होते. ही आहेर यांची जमेची, तर कोकणी यांची पडकी बाजू ठरली. कोकणी यांच्या बाजूने अवघे सहा संचालक होते. त्यामुळे त्यांनाही ऐनवेळी तलवार म्यान करावी लागली. यापूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी संचालकांची जुळवाजुळव करून त्यांना थेट निवडणुकीच्या दिवशीच सभागृहात हजर केले जाई. तोपर्यंत संचालक पर्यटनाचा आनंद लुटत. यावेळी तसे काहीच घडले नाही. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीच सकाळी सर्व संचालक शहरातील एका हॉटेलमध्ये जमले होते. बरोबर 11 वाजता एकापाठोपाठ एक संचालकांची वाहने बँकेच्या आवारात दाखल झाली. आणि बँकेच्या चेअरमन निवडीत असलेल्या धक्का तंत्राची पुनरावृत्ती झाली.