Sat, Jul 20, 2019 23:20होमपेज › Nashik › लोकप्रतिनिधींच्या घरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

लोकप्रतिनिधींच्या घरात स्वाईन फ्लूने मृत्यू; भीतीचे वातावरण

Published On: Sep 11 2018 5:44PM | Last Updated: Sep 11 2018 5:58PMपंचवटी : वार्ताहर 

पंचवटी परिसरातील प्रभाग क्रमांक तीनच्या नागरसेविकेचे चुलत सासरे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . वैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून देखील त्यांनी कोणतीच तसदी घेतली नसल्याने नातेवाईकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. तर लोकप्रतिनिधींच्या घरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.  

पंचवटी परिसरातील मानेनगर येथे राहणारे दिलीपराव पोपट माने ५७ याना गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लू सदृश आजार झाल्याने त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजराची लक्षणे ही स्वाईन फ्लू सदृश्य दिसत असल्याने पंचवटी प्रभागाच्या माजी सभापती आणि नगरसेविका प्रियांका माने यांनी आपल्या चुलत सासऱ्यांना स्वाईन फ्लू सदृश आजराची लागण झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी जयराम कोठारी यांना दिली होती. तसेच रिपोर्ट आल्यानंतर स्वाईन फ्लूचीच लागण झाल्याचे  स्पष्ट झाल्यावर देखील कोठारी याना फोन करून कळविले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी एकदाही या माने कुटूंबियांची भेट घेतली नाही किंवा रुग्नाची विचारपूस केली नाही. तसेच परिसराला भेट देऊन पाहणी केली नसल्याचा आरोप प्रियांका माने यांनी केला आहे. 

दिलीपराव माने याना स्वाईन फ्लू सदृश आजाराची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च देखील झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी सोमवार दि १० रोजी रात्री उशिरा दिलीपराव माने यांची प्राणज्योत मालवली. लोकप्रतिनिधींच्या घरातील नातेवाईकांना झालेल्या स्वाईन फ्लूसारख्या गंभीर आजाराची दखल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या संतापाचे वातावरण आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी जोर धरू लागली आहे. 

लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांसोबत अधिकाऱ्यांची अशी वागणूक असेल तर सामान्य नागरिकांचे काय? मनपाच्या वैद्यकीय अधिकारी खासगी हॉस्पिटलांकडून सुपारी घेऊन कामकाज करीत असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचा जीव जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी  प्रतिक्रिया  प्रभाग तीनच्या नगरसेवक  प्रियांका माने यांनी दिली.