Thu, Apr 25, 2019 21:29होमपेज › Nashik › पालिकेच्या ७० शाळा ‘अ’ श्रेणीत 

पालिकेच्या ७० शाळा ‘अ’ श्रेणीत 

Published On: Nov 30 2017 11:30PM | Last Updated: Nov 30 2017 11:21PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या 127 पैकी 33 शाळा ‘अ’ श्रेणीत आल्या असून, डिसेंबरअखेरपर्यंत आणखी 70 शाळा ‘अ’ श्रेणीमध्ये आणण्यासाठी मनपा शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी खास अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. 

शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आदेशानुसार शासनाने प्रत्येक शाळेचा दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधरविण्याच्या दृष्टीने 125 गुणांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, वाचन, लेखन, इतर कलागुण, शाळा स्वच्छता, परिसर स्वच्छता, सामूहिक कविता वाचन, शिक्षकांचे अध्ययन यासह विविध प्रकारच्या घटकांसाठी गुण देण्यात आले आहेत. त्यानुसार त्या-त्या शाळेमार्फत शासनाने दिलेल्या घटकांची तपासणी करून गुण दिले जातात. त्यात या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने नाशिक मनपा शिक्षण मंडळाने सर्वच्या सर्व म्हणजे 127 शाळा ‘अ’ श्रेणीमध्ये आणण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली असून, त्यात टेक्नोसॅव्ही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात 80 व त्यापेक्षा जास्त गुण पटकावणार्‍या शाळांचा ‘अ’ श्रेणीमध्ये समावेश केला जात आहे. 127 पैकी सध्या 33 शाळा ‘अ’ श्रेणीत समाविष्ट झाल्या आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत आणखी 70 शाळा ‘अ’ श्रेणीत दाखल होतील, असा विश्‍वास मनपा प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी व्यक्त केला. 

50 ते 60 या दरम्यान गुण मिळविणार्‍या शाळांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अशा शाळांची संख्या 40 हून अधिक आहे. तसेच 60 ते 70 गुण मिळविणार्‍या शाळांचाही यात समावेश आहे. या शाळा 80 गुणांपर्यंत आल्या की त्यानंतर 40 ते 50 गुण मिळविणार्‍या शाळांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.