Mon, Jun 24, 2019 21:14होमपेज › Nashik › जिल्ह्यात २८६ अंगणवाड्या तहानलेल्या!

जिल्ह्यात २८६ अंगणवाड्या तहानलेल्या!

Published On: Jan 05 2018 1:17AM | Last Updated: Jan 04 2018 11:35PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तब्बल 286 अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्यासाठी पाण्याची सुविधाच उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. तर 123 134 अंगणवाड्यांना छप्परच नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावरच  शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असल्याची निराशाजनक बाबही उघडकीस आली आहे. तसेच 123 ठिकाणी नोंदवहीच अद्ययावत नसल्याचेही पाहणीत आढळले.  

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने गेल्या महिन्यात अंगणवाड्यांच्या भेटीचा कार्यक्रम निश्‍चित केला होता. जिल्ह्यात एकूण 4776 अंगणवाड्या असून, पहिल्या टप्प्यात 824 अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी तेवढ्याच अधिकारी-कर्मचार्‍यांची मदत घेण्यात आली. तपासणीअंती दिलेल्या अहवालात अंगणवाडीतील अनेक गैरसोयींवर प्रकाश पडला. 690 अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती असल्या तरी 134 अंगणवाड्यांना मात्र इमारतीच नसल्याने बालकांना उघड्यावर बसूनच ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. तसेच 221 अंगणवाड्यांमध्ये शौचालयांची सुविधाच नसल्याचे समोर आले. 538 अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. 286 अंगणवाड्यांमधील बालकांची मात्र याबाबतीत गैरसोय आहे. एवढेच नाही तर 104 अंगणवाड्यांमध्ये पाणी साठवणुकीची सुविधाच नसल्याचेही अधिकार्‍यांना दिसून आले. पोषण आहार शिजविण्यासाठी स्वतंत्र खोल्या बांधण्यात आल्या आहेत. पण, हाच पोषण आहार शिजविण्यासाठी 284 अंगणवाड्यांमध्ये स्वयंपाकाची भांडीच नाहीत. बालकांचे वजन तपासण्यासाठी 70 अंगणवाड्यांमध्ये वजन काटेच नाही. दर्शनी भागावर वेळापत्रक लावणे आवश्यक असले तरी 154 अंगणवाड्यांमध्ये वेळापत्रकच दिसून आले नाही.