Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Nashik › महापौरांच्या भेटीतच २३ कर्मचारी गैरहजर 

महापौरांच्या भेटीतच २३ कर्मचारी गैरहजर 

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:41PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

महापौर रंजना भानसी यांनी सकाळी पंचवटी विभागात विविध ठिकाणी स्वच्छतेसंदर्भातील पाहणी व आढावा घेतला. त्यात अनेक ठिकाणी हजेरी शेडला भेट देऊन माहिती घेतली असता त्यात 23 सफाई कर्मचारी गैरहजर असल्याची बाब समोर आली असून, संबंधित कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात येणार आहे. शहरात सर्वच ठिकाणी पदाधिकारी कुठेही, कधीही अचानक भेटी देऊन स्वच्छतेविषयीची माहिती घेणार आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर 500 अमृतसिटींमधून नाशिकला वरच्या क्रमांकावर स्थान मिळवून देण्यासाठी महापौरांसह सर्वच पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार महापौरांनी त्यांच्या प्रभागापासूनच त्याची सुरुवात केली. म्हसरूळ, दिंडोरी रोड तसेच दिंडोरी नाका ते पेठ नाका येथील विविध ब्लॅकस्पॉटची पाहणी करून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर महापौरांनी या दोन्ही ठिकाणच्या रस्ता दुभाजकातील वाढलेल्या वेली व वृक्षांच्या फांद्यांची छाटणी तसेच, स्वच्छता करण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षकांना केल्या. यानंतर त्यांनी रामकुंड येथील हजेरी शेडला भेट दिली. तिथे 26 पैकी सात सफाई कर्मचारी कामावर आलेलेच नसल्याचे आढळले. त्यात सिध्दार्थ शेवाळे, श्याम पवार, भावना लालजी, ईश्‍वर धासने, नितीन जाधव, राजेश बीटलीन, इंदिरा गांधी हजेरी शेड येथेही सरला गायकवाड, प्रताप चव्हाण, दिने पढाया, किरण शिंदे, विनय मकवाना, कामिनी भालेराव, मिना मुन्सी, संजयनगर येथील शेडमध्ये मनोज ढवळे, दादाजी बागूल तर फुलेनगर येथील हजेरी शेड येथे संतोष धोंडे, जितेंद्र साळुंके, नीता मकवाना, दत्तात्रय सकट, नरेश मकवाना, सागर देवल यांचा समावेश आहे. या संबंधितांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले. 

कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी नेमणूक, रात्रपाळीतील स्वच्छता बंद करणे आणि प्रभागनिहाय समान कर्मचार्‍यांची नियुक्ती यासंदर्भात आयुक्तांनी आरोग्य अधिकारी सुनील बुकाणे यांना मंजुरी दिली आहे. असे असताना अधिकारी यासंदर्भात कार्यवाही करत नसल्याची बाब सभागृह नेते दिनकर पाटील यांनी निदर्शनास आणून दिली.