Fri, Nov 16, 2018 02:49होमपेज › Nashik › मराठीच्या पेपरला २० कॉपी बहाद्दर

मराठीच्या पेपरला २० कॉपी बहाद्दर

Published On: Mar 01 2018 11:03PM | Last Updated: Mar 01 2018 10:58PMनाशिक : प्रतिनिधी 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला असून,  गुरुवारी (दि.1) मातृभाषा मराठीच्या पहिल्याच पेपरला नाशिक विभागात भरारी पथकाने 20 कॉपी बहाद्दरांना पकडले. विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 13 कॉपी बहाद्दर आढळले. दरम्यान, पहिला पेपर सोपा गेल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे.

नाशिक विभागात दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ होते. परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील 295 परीक्षा केंद्रांवर कडेकोट  बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उशीरा आल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले असते. त्यामुळे अर्धातास अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर होते. पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर तणाव दिसत होता. कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी पेपर कालावधीत भरारी पथक कार्यरत होते. तसेच, सीसीटिव्हीद्वारे निगराणी केली जात होती. मातृभाषा मराठीचा पेपर असूनही विभागात 20 कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले. जळगावमध्ये सर्वाधिक 13 प्रकरणे समोर आली. त्या खालोखाल नंदुरबार पाच व धुळे येथे दोन कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले. कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांवर शिक्षण मंडळ कॉपी केस दाखल करणार आहे. दरम्यान,  पेपर सोपा गेल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी बाहेर आल्यावर दिली.मातृभाषा मराठीचा पेपर सोपा गेल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्यामुळे परीक्षेपुर्वीचा विद्यार्थ्यांवरील तणाव निवळल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, सोमवारी (दि.5) संस्कृतचा पेपर होणार आहे. मध्ये सलग तीन दिवस सुट्टी आल्याने विद्यार्थ्यांना पुढील पेपरची तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे.