Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Nashik › सुरगाण्यात १६६ पुरुषांची नसबंदी

सुरगाण्यात १६६ पुरुषांची नसबंदी

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंबर कसली असून, त्या अनुषंगानेच आदिवासी बहुल सुरगाणा तालुक्यात विशेष मोहीम राबवून 166 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

कुटुंब कल्याण नियोजनाची जबाबदारी ही महिलेची असून, शस्त्रक्रियेसाठी महिलेलाच शहरी भागात पुढे केले जाते. शस्त्रक्रिया केल्यानंतर भविष्यात शारीरिक त्रास होईल, या भीतीतून शहरी भागातील पुरुष स्वत: कुटुंब नियोजनासाठी पुढे येत नसल्याचा आरोग्य विभागाचा अनुभव आहे. या तुलनेत ग्रामीण त्यातल्या त्यात आदिवासी भागातील पुरुष मात्र कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता नसबंदी शस्त्रक्रिया करून घेत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने सुरगाणा तालुक्यात कुटुंब कल्याण नियोजनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नुकतीच विशेष मोहीम राबविली. पळसन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आठवडाभराच्या कालावधीत दोनदा शिबिर घेण्यात आले. यात 103 पुरुषांची नसबंदी करण्यात आली. शुक्रवारी उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेण्यात आले असून, त्यात 53 पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. या कामी वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज देवरे आणि समाधान पाटील यांनी पुरुषांमध्ये जागृती करून त्यांना शस्त्रक्रियेस प्रवृत्त केले. म्हणजे, या विशेष मोहिमेत एकूण 166 पुरुषांनी कुटुंब कल्याण नियोजनाचा भार स्वत:च्या खांद्यावर घेतला. ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आली असून, या कामी तालुका वैद्यकीय अधिकारी लिना ढाके यांनी परिश्रम घेतले. बार्‍हे, मनखेड, पांगारणे, माणी या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी कपिल जाधव, सचिन साबळे, विनायक चौधरी, सुभाष आव्हाड, आरिफ सय्यद आदींसह आरोग्यसेवक, परिचरांनी परिश्रम घेतले.