Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › बॉश कंपनीतील ठेकेदाराकडून ११ कोटींची फसवणूक

बॉश कंपनीतील ठेकेदाराकडून ११ कोटींची फसवणूक

Published On: Jan 05 2018 1:17AM | Last Updated: Jan 04 2018 11:46PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

बॉश कंपनीतील सुटे पार्टस् चोरी केल्यानंतर सिडकोतील पंडितनगर भागात कंपनी सुरू करून नव्याने स्पेअर पार्टस् बनवून त्यांची विक्री करणार्‍या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून, मुख्य संशयित फरार झाला आहे. या टोळीने अंदाजे पाच वर्षांपासून भंगार (स्क्रॅप) असलेले सुटे पार्टस् बॉश कंपनीतून चोरले. तसेच, काही काही पार्टस् वितळवून पुन्हा नव्याने तयार करून त्याची दिल्ली, पंजाबसह इतर भागांत विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 

शिश अहमद अस्लम हुसेन खान (21, रा. अंबड लिंकरोड) आणि अहमद रजा शुभराजी खान (18, रा. संजीवनगर, अंबड लिंकरोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीतील मुख्य संशयित फरार असून, तो बॉश कंपनीचा ठेकेदार असल्याचे समोर आले आहे. या टोळीतील कंपनीतील अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का, याचाही पोलीस शोध घेत आहे. या टोळीकडून अंबड पोलिसांनी 23 टन भंगार जप्त केले असून, त्याची किंमत 10 कोटी 67 लाख रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे दोन वाहनेही जप्त केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना एका कंपनीतून स्पेअरपार्टची चोरी करून त्याची फिनिशिंग करून तो माल पुन्हा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी अनेक महिन्यांपासून संशयितावर पाळत ठेवली होती. संशय पक्का होताच पोलिसांच्या पथकाने सोमवारी (दि.1) रात्री सिडकोतील चौथ्या स्किमच्या पंडितनगर येथील तीन मजली इमारतीवर छापा टाकला. यावेळी संशयित शिश खान आणि अहमद खान यांना ताब्यात घेत चौकशी केली. तसेच, त्यांच्याकडून बॉश कंपनीचे नोझल, मिडल्स, वॉल्व्ह सेट, वॉल्व्ह पीस, वॉल्व्ह पिस्टन व सुटे स्पेअरपार्टचा 23 टन मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळावरच पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.