Mon, Jun 17, 2019 03:20होमपेज › Nashik › भाजपाकडून राणेंची फसवणूक

भाजपाकडून राणेंची फसवणूक

Published On: Mar 03 2018 2:06AM | Last Updated: Mar 03 2018 2:00AMनाशिक : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसमधून बाहेर काढले, त्यानंतर त्यांना वेगळा पक्ष स्थापन करायला लावून  मींत्रपदाचे आश्‍वासन दिले आणि आता राज्यसभेची ऑफर देण्यात आली. भारतीय जनता पक्ष राणे यांची फसवणूक करीत असून‘ यापुढे कोणताही नेता भाजपात जाण्याआधी विचार करेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उत्तर महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेचा समारोप येत्या 10 मार्चला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गोल्फ क्लब मैदानावर होणार्‍या जाहीर सभेने होणार असून त्यापार्श्‍वभूमीवर त्यांनी दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघानिहाय बैठक घेतली. त्यानंतर मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा दबावाचे राजकारण करीत असून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही टीका त्यांनी केली. 

 दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची बैठक चांदवड येथे तर नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक राष्ट्रवादी भवनात झाली. उत्तर महाराष्ट्रात नगर जिल्ह्यातून हल्लाबोल यात्रेला सुरूवात झाली. नाशिक जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर ही यात्रा तीन दिवस मुक्कामी होती. दरम्यानच्या काळात झालेल्या जाहीर सभांमधून  सरकारच्या कारभारावर कडक ताशेरे ओढण्यात आले. पाटील यांनी हल्लाबोल यात्रेमागचा उद्देश सांगताना सरकारवर टीकेची झोड उठविली. नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार याठिकाणी फिरून आल्यानंतर हल्लाबोल यात्रेचा समारोप नाशिकमध्ये येत्या 10 मार्चला गोल्फ क्लब  मैदानावर होणार असल्याची माहिती  त्यांनी दिली. यावेळी होणार्‍या जाहीर सभेस पक्षाध्यक्ष पवार संबोधित करणार आहेत. सभेच्या नियोजनाचाच भाग म्हणून लोकसभा मतदारसंघानिहाय बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळात लक्षवेधी सूचना चर्चेला येऊ नये म्हणून पैसे द्यावे लागत असल्याची ध्वनिचित्रफीत एका वृत्तवाहिने ऐकविली. त्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात आल्याने प्रचंड गदारोळ झाला. यावर पाटील म्हणाले की, हा मुंडे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. पण, यात विरोधक कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.