Sat, Jun 06, 2020 22:45होमपेज › Nashik › गावे बदलली, नावे कायम!

गावे बदलली, नावे कायम!

Last Updated: Oct 09 2019 11:22PM
नाशिक : प्रतिनिधी

महिलांच्या तक्रार निवारणासाठी नेमणूक झालेल्या अधिकार्‍यांची बदली झाली..त्यांचे गाव बदलले...बदलीच्या ठिकाणी ते रवानाही झाले....मात्र पूर्वीच्या ठिकाणी त्यांची नावे, संपर्क क्रमांक असलेले फलक मात्र अद्यापही झळकत आहेत... त्यामुळे तक्रारदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचेही दर्शन घडत आहे. हे फलक हटविण्याची तसदी पिंपळगाव बसवंत पोलीस प्रशासन का घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी महिला तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन जानेवारी 2019 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संदीप दराडे, पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस निरीक्षकपदी सुरेश मनोरे यांची नियुक्ती होती. उद्घाटनानंतर केंद्राबाहेर दोन फलक लावण्यात आले. त्यावर केंद्राची जबाबदारी सांभाळणार्‍या अधिकार्‍यांची नावे आणि संपर्क क्रमांक आहेत.  त्यापैकी पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी यांची काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे बदली झाली आहे. तर, दुसर्‍या फलकावर अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग, पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांची नावे आहेत. मात्र, वरील सर्व अधिकार्‍यांची बदली झालेली असताना फलकावर त्यांची नावे झळकत आहेत. आता नवीन अधिकार्‍यांची नावे टाकणे गरजेचे असतानाही अद्याप त्यांची नावे टाकलेली नाहीत. त्यामुळे याठिकाणी येणार्‍या ग्रामस्थांमध्ये संभ्रम होत आहे. नेमके अधिकारी कोण, हेच उमजत नसल्याने तक्रार कुणाकडे करावी, असा पेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.