Thu, Apr 25, 2019 21:42होमपेज › Nashik › रेल्वेला आता होमगार्ड्सचे सुरक्षाकवच

रेल्वेला आता होमगार्ड्सचे सुरक्षाकवच

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:52PM

बुकमार्क करा

उपनगर : वार्ताहर

वाढती गुन्हेगारी, चोर्‍या, खून आणि प्रवाशांची होणारी लूटमार लक्षात घेऊन रेल्वेने आता होमगार्ड तैनात करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी होमगार्ड्सची मदत घेण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. मुंबईत त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, नाशिकरोडला लवकरच होमगार्ड तैनात होणार याची खात्रीलायक माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

भुसावळ परिमंडळातील नाशिकरोड, मनमाड, खंडवा, अकोला येथे होमगार्ड्सची मदत घेण्याचा प्रस्ताव असून, मध्य रेल्वेला तो पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ परिमंडळ अंतर्गत येणार्‍या रेल्वे स्टेशनमध्ये भरती होणार्‍या होमगार्डचे प्रशिक्षण मध्य रेल्वेतर्फे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन अधिकार्‍यांचे (एमएसएससी) दोन दिवसांचे प्रशिक्षण नाशिकरोडच्या सामनगाव आरपीएफच्या केंद्रात नुकतेच झाले. यामध्ये संभाव्य धोके लक्षात घेऊन उपाय आणि प्रवाशांच्या सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. 
होमगार्डला ‘अच्छे दिन’

मानधन तत्त्वावर अथवा पगारावर काम करणार्‍या होमगार्डला रेल्वेच्या निर्णयामुळे ‘अच्छे दिन’ येणार आहे. राज्य सरकारने होमगार्डवरील खर्च कमी केला आहे. त्यांचे सराव सत्रही कमी केले आहेत. सरकारच्या बचतीच्या धोरणामुळे त्यांच्यावर संक्रांत आली आहे. नवरात्र, गणेशोत्सव आदींवरच होमगार्डसची भिस्त आहे. नाशिकरोड कारागृहात होमगार्डसची मदत घेतली जात होती. आता रेल्वे स्टेशनवर त्यांची मदत घेतली जाणार आहे.