Tue, Nov 20, 2018 05:27होमपेज › Nashik › साहेब, कसं काय बरं आहे ना!

खुनाचा आरोपी मंत्र्यांना म्हणतो, साहेब, बरं आहे ना!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

तो आला... त्याने हस्तांदोलन केले...  आणि ‘साहेब कसं काय, बरं आहे ना,’ असे म्हणत गर्दीतून तो निघूनही गेला...ही घटना आहे, खुनाचा आरोप असलेला भाजपाचा नगरसेवक हेमंत शेट्टी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीची... शनिवारी नाशिक दौर्‍यावर आलेल्या महाजन यांची शेट्टी याने ‘शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन ‘आस्थे’ने विचारलेली ख्यालीखुशाली उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली नसली तर नवलच!

तसेही महाजन असो वा शेट्टी, दोघेही नेहमीच वादग्रस्त व चर्चेत राहिले आहेत. पालकत्वाची जबाबदारी असतानाही महाजन यांच्या ‘घोड्या’चे नाशिककरांना अनेकदा झालेले दर्शन, तर नगरसेवकपद वाचविण्यासाठी महापालिकेची महासभाच रोखून धरण्यास भाग पाडणारा शेट्टी याचाही अनुभव नुकताच नाशिककरांनी घेतला. त्याचमुळे काही क्षणांपुरती का होईना या दोघांची झालेली भेट अनेक राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवयाही उंचावून जाणारी ठरली.

खुनाच्या आरोपावरून काही महिने मध्यवर्ती कारागृहात मुक्कामी असलेल्या  शेट्टीला नुकताच जामीन मंजूर झाला आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या याच शेट्टीसह काही कुख्यात गुंडांना महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन भाजपेयींनी पावन करून घेतले. त्यात शेट्टीला नगरसेवकपदही मिळाले. पण, सलग सहा महासभांना गैरहजर राहिल्याने पद धोक्यात आले होते. शेट्टीचे नगरसेवकपद शाबूत ठेवण्यासाठी कोणी आणि कसे प्रयत्न केले, हे गेल्या महासभेच्या निमित्ताने समोरही आले. हा सारा घटनाक्रम पाहता, शेट्टी आणि महाजन यांच्या शनिवारी झालेल्या भेटीने राजकीय  वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.