Fri, May 24, 2019 08:28होमपेज › Nashik › खुनातील फरार संशयिताला बेड्या

खुनातील फरार संशयिताला बेड्या

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 27 2018 11:24PMसिन्‍नर : प्रतिनिधी

साडेचार वर्षांपुर्वी सासर्‍याचा खुन करून फरार झालेल्या संशयित आरोपीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांना यश आले आहे. सोमनाथ फुलाजी मोरे ( 27, रा. खंबाळे) याला चांदवड तालुक्यातील बोपाने गावातून पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

साडेचार वर्षांपूर्वी नांदूरशिंगोटे शिवारात 19 ऑगस्ट 2013 रोजी पत्नीस नांदावयास पाठवत नाही याचा राग मनात धरून मोरेने सासरा आत्माराम नामदेव सूर्यवंशी (55) यांचा धारदार शस्त्राने खून केला होता.  गुन्हा घडल्यापासून  संशयित मोरे नंदूरबार व नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून रहात होता. त्यामुळे पोलिसांना मोरेच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत होते. 

पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी जिल्हा अभिलेखावरील फरार आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकअशोक कर्पे यांनी फरार आरोपीचा ठाव-ठिकाणा शोधण्याबाबत सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांना संशयित आरोपी मोरे चांदवड तालुक्यातील बोपाने गावात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून मोरेला अटक केली.

पोलीस उपनिरीक्षक  स्वप्नील नाईक, पोलीस हवालदार प्रकाश चव्हाणके,रवींद्र वानखेडे, पोलीस नाईक दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल किरण काकड, हेमंत गिलिबले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला होता.