Fri, Jul 19, 2019 22:02होमपेज › Nashik › स्वामीनारायणच्या ‘लंडन पॅलेस’ला मनपाची नोटीस

स्वामीनारायणच्या ‘लंडन पॅलेस’ला मनपाची नोटीस

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 02 2017 12:11AM

बुकमार्क करा

नाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

पंचवटीतील आडगाव नाका परिसरातील स्वामीनारायण ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर विवाह समारंभासाठी अनधिकृत स्टेज, टॉवर व स्टॅच्यू उभारल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने ट्रस्टला नोटीस बजावली असून, अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी बड्या असामी आणि लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांचे विवाह सोहळे होतात. त्यांचेच पाठबळ या अनधिकृत बांधकामांना मिळत असल्याचे बोलले जात आहे.

आडगाव नाका परिसरात स्वामीनारायण ट्रस्टने विवाह सोहळ्यासाठी भव्यदिव्य देखावे उभारले आहेत. आतील बाजूला लंडनमधील टॉवर व स्टॅच्यूचे आकर्षक असे 30 मीटर बाय 45 मीटर आकाराचे देखावे आहेत. एवढ्या मोठ्या स्वरूपातील स्टेज व देखाव्यांचे बांधकाम उभे करताना ट्रस्टने मनपाच्या नगररचना विभागाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. यामुळे यासंदर्भात 31 ऑगस्ट 2017 रोजी मनपा अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त आर. एम. बहिरम यांनी अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत अंतिम नोटीस बजावली आहे. यापूर्वीदेखील या विभागाने 18 मे आणि 27 जून 2017 रोजी नोटीस बजावली आहे. अंतिम नोटीस देताना बांधकाम सात दिवसांच्या आत काढून घेण्याचे कळविले होते. मुदतीत बांधकाम न काढल्यास येणारा एक लाख सहा हजार रुपयांचा खर्च ट्रस्टकडून वसूल केला जाईल, असे नोटीसीत म्हटले होते. अंतिम नोटीस देऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही ट्रस्टने मनपाचा आदेश झुगारत अनधिकृत बांधकाम तसेच ठेवले आहे. ट्रस्टने परवानगीसाठी केलेला अर्ज, सातबारा उतारा, मंदिर ट्रस्ट आणि डिंगोरे मंडप डेकोरेटर्स यांच्यात झालेल्या करारनाम्याची माहिती सचिन दप्तरे यांनीदेखील मनपा नगररचना विभागाकडे माहिती मागितली असता स्टेज बांधकामासाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याचे नगररचनाने कळविले आहे.