Tue, May 21, 2019 00:06होमपेज › Nashik › सारूळ शिवारातील दगडखाणी बंद 

सारूळ शिवारातील दगडखाणी बंद 

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 1:48AMनाशिक : प्रतिनिधी

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या सारूळ शिवारातील दगडखाणींना जिल्हाधिकार्‍यांनी अखेर परवानगी नाकारल्याने तेथील दगड उत्खनन आता बंद होणार आहे. त्यामुळे या भागातील डोंगरांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील 20 खाणींमधून दगड उत्खननाला मान्यता देण्यात आली आहे.  

फेबु्रवारीच्या अखेरीस सारूळ शिवारातील 30 पैकी 13 खाणींची मुदत संपुष्टात आली आहे. पर्यावरणीय निकषाच्या आधारावर संबंधित खाणींना मुदतवाढ देण्यावरून प्रशासनामध्ये खल सुरू होता. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी सारूळ येथील खाणींमधून किती उत्खनन करण्यात आले, किती उत्खनन होऊ शकते. तसेच, उत्खननाची खरंच गरज आहे का, असे प्रश्‍न उपस्थित करत खाणींना परवानगी नाकारली आहे. दरम्यान, वाळू घाटांचे ठेके देताना यापूर्वीच उच्च न्यायालयाने राज्यभरातील लिलावावर बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यत एकही घाटाचा लिलाव करू नये, अशी सक्त ताकीदही दिली आहे. याचदरम्यान, लिलावात काढल्या जाणार्‍या घाटांचे पर्यावरणीय अहवाल तयार करून त्याला केंद्रीय पर्यावरण मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मान्यता घेण्याच्या सुचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. वाळू घाटांचा अनुभव गाठीशी असल्याने सारूळमधील खाणींना प्रशासनाने पर्यावरणाचा निकष लावत परवानगी नाकारली आहे. त्याचवेळी लाखलगावमधील एका खाणीला मान्यता देण्यात आली आहे. 

सारूळमधील खाणींना परवानगी देण्यात आलेली नसताना जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील 20 खाणींमधून पुन्हा दगड उत्खननास मान्यता देण्यात आली आहे. या मान्यता देतानाही प्रशासनाने पर्यावरणाच्या निकषाला कोठेही बाधा पोहचणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. या खाणींना मान्यता देण्यात आल्याने बांधकाम व्यवसायासाठी दगड व खडी तसेच कच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.