Mon, Jun 17, 2019 02:36होमपेज › Nashik › येवल्यात भाजपाच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर

येवल्यात भाजपाच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 11:55PMयेवला : प्रतिनिधी

केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता , त्याचबरोबरीने  राष्ट्रवादीच्या बाहुबली भुजबळांच्या ताब्यातून काबिज केलेल्या येवला नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष असतानाही विविध विकासकामे निधीअभावी सव्वा वर्षापासून रखडली आहेत.  विरोधक व सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकीत पालिकेसमोर नगराध्यक्षांच्या विरोधात धरणे आंदोलन केले.

गुरुवारी (दि.22) नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक नगसेवक व अपवाद वगळता सत्ताधारी व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी विकासकामे होत नाही, असा जाब विचारून नगराध्यक्षांना या सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले. त्यानंतर सभेवर बहिष्कार टाकीत धरणे आंदोलन केले.  जनतेच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या धरणे आंदोलनामध्ये भाजपाचे 2 नगरसेवक सामिल झाल्याने शहरामध्ये नव्या समीकरणाची चर्चां सुरु झाली आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी धरणे आंदोलनात सहभाग घेऊन भाजपला घरचा आहेर दिला.

येवले नगरपालिकेच्या राजे रघुजीबाबा संकुलातील सभागृहामध्ये गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. संतप्त नगरसेवकांनी आमची कामे होते नाही, आपले नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहे त्याच पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात असूनही येवल्यासाठी का निधी उपलब्ध होत नाही, नगराध्यक्ष नेमके करता काय असा सवाल केला. सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकीत राष्ट—वादी, अपक्ष यांचे सर्व नगरसेवकांसह भाजपचे गणेश शिंदे , पुष्पा गायकवाड तर शिवसेनेच्या सरोजिनी वखारे यांनी सभात्याग केला.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला निषेध

सभात्यागानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे धरीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घोषणाबाजी व निषेध व्यक्त केला. या धरणे आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते डॉ.संकेत शिंदे, सचिन शिंदे, प्रविण बनकर, निसार शेख, प्रा.शितल शिंदे  परविनबानो शेख, तेहसिन शेख, सबिया मोमीन, रईसाबानो शेख , निता परदेशी, अपक्ष गटनेते नगरसेवक रुपेश लोणारी, सचिन मोरे, अमजद शेख, अपक्ष नगरसेविका पद्मा शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे, शिनसेनेच्या नगरसेवका किरण जावळे, सरोजिनी वखारे यांनी सहभाग घेतला होता. तर जनतेच्या रोजच्याच प्रश्नाला उत्तरे देऊन कंटाळलेल्या भाजपाचे नगरसेवक गणेश शिंदे व नगरसेविका पुष्पा गायकवाड यांनीही या धरणे आंदोलनात सहभागी होत भाजपला घरचाच आहेर दिला.