Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Nashik › तीन लाख विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘परीक्षा पे चर्चा’

तीन लाख विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘परीक्षा पे चर्चा’

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 11:47PMनाशिक : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी केलेली ‘परीक्षा पे चर्चा’ जिल्ह्यातील 995 शाळांमधील दोन लाख 98 हजार 49 विद्यार्थ्यांनी ऑडिओच्या माध्यमातून ऐकली आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहिलीही. अर्थात, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागानेच तसा अहवाल तयार करून सरकारला सादर केला आहे.

परीक्षेला तणावमुक्त सामोरे जा, स्पर्धा नको, असा संदेश देण्यासाठी पंतप्रधानांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला. आता हा कार्यक्रम दिल्लीत असला तरी देशाच्या कानाकोपर्‍यातील  नेमक्या किती शाळा आणि विद्यार्थी यात सहभागी झाले, याची माहिती सादर करण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाला प्राप्त होते. त्यानुसार जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण 1125 शाळा असून, त्यापैकी 995 शाळांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या शाळांमधील एकूण दोन लाख 98 हजार 49 विद्यार्थ्यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ अनुभवली. ज्या शाळांमध्ये प्रोजेक्टर, संगणक आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांनी ही चर्चा प्रत्यक्ष पाहिली अन् ऐकलीही. अर्थात,  शाळेनेच तशी व्यवस्था करून दिली होती. तर ज्याठिकाणी अशा सोयीसुविधा नाही, अशा शाळांमध्ये मात्र रेडिओच्या माध्यमातून  चर्चा नुसतीच ऐकण्यात आली. चर्चेत सहभागी झाल्याचा पुरावा म्हणून छायाचित्र, व्हिडिओ अहवालाच्या आधारे सरकारला सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना सरकारीपातळीवरून आधीच शिक्षण विभागाला देण्यात आली होती.  त्यामुळे शाळांनाही विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करणे आवश्यक होते.

130 शाळांचा सहभाग नाही

‘परीक्षा पे चर्चा’  130 शाळांमधील विद्यार्थ्यांना  ना बघता आली, ना ऐकता आली.  या शाळांनी सहभागच नोंदविला नसल्याचे अहवालात नमूद असल्याने याठिकाणी ऑडिओ, व्हिडिओ अशी कोणतीच व्यवस्था नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना पंतप्रधांनाच्या या चर्चेपासून वंचित राहवे लागले.