Fri, Apr 19, 2019 08:29होमपेज › Nashik › भारत गॅस कंपनीविरोधात मनसे आक्रमक

भारत गॅस कंपनीविरोधात मनसे आक्रमक

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Dec 31 2017 10:50PM

बुकमार्क करा
सिन्‍नर : प्रतिनिधी

तालुक्यातील माळेगाव एमआयडीसीमधील भारत गॅस कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत आहे. या विरोधात तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी (दि.31) तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

भारत गॅस कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांना कमी करण्याचा घाट घातला जात आहे. कंपनीतील बहुतांश कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. काही स्थानिक कंत्राटी कामगारांना गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून मारहाण केली जात आहे. सोबतच कामगारांना कंपनीत येण्यास मज्जाव केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

अनेक कामगार मागील दहा वर्षांपासून भारत गॅस कंपनीत कार्यरत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने नेमणूक केलेल्या ठेकेदाराकडून सदर कामगारांचे वेतन थकविले असून, पीएफचाही भरणा केला नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत संबंधित कर्मचार्‍यांनी विचारणा केल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद शिंदे, कमलाकर शेलार, रामदास भाबड, आत्माराम डावरे, सलिम शेख, राजेंद्र ढोंमरे, सुनील साबळे, सुनील माळी, अंकुश खाडे, कैलास दातीर, सुनील जगताप, अर्जुन घोरपडे  सहभागी झाले होते.