होमपेज › Nashik › आ. भुजबळ - सहाणे भेट

आ. भुजबळ - सहाणे भेट

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 11:00PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झालेले व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेलेले अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांची सोमवारी प्रत्यक्ष भेट घेतली.

सहाणे यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारीही पदरात पाडून घेतली होती. पण, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सहाणे पक्ष कार्यालयात फिरकलेही नव्हते. पक्षापासून दूर गेल्याने  केवळ उमेदवारीसाठी पक्षात आले होते की काय, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली. विशेष म्हणजे, जामिनावर सुटका झाल्यानंतर भुजबळ अडीच वर्षांनंतर प्रथमच नाशिकमध्ये आले तेव्हा प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. पाथर्डी फाटा ते गणेशवाडी अशी मिरवणूक काढल्यानंतर राष्ट्रवादीच्या मुंबई नाकास्थित कार्यालयात भुजबळ यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर पुढील काही दिवस येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर या भागांत भुजबळांचे दौरे झाले होते. या सार्‍यात सहाणे कुठेही दिसून आले नव्हते. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. निवडणूक निकालानंतर भुजबळांची मदत झाली, अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केल्यावर सहाणे नाराज झाल्याचे त्यावेळी बोलले गेले. भुजबळांनी दराडे यांची प्रतिक्रिया खोडून काढावी, अशी त्यांची अपेक्षा होती. या सार्‍या घडामोडींनंतर सहाणे यांनी सोमवारी भुजबळ यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पुण्यात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात वरिष्ठांनी भुजबळांना मानाचे स्थान दिले होते. तसेच नाशिक दौर्‍यातही भुजबळ यांचा बोलबाला दिसून आला होता. म्हणजे पुढील राजकीय वाटचाल करायची तर भुजबळांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही, असा विचार करूनच सहाणे यांनी भुजबळांची भेट घेतली असावी, असा अर्थ काढला जात आहे. एक तर शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याने पुन्हा परतणे अवघड आहे. तर भाजपामध्ये निभाव लागणे कठीण आहे. काँग्रेसची अवस्था तर केविलवाणी आहे. म्हणजे पुढील राजकीय वाटचाल राष्ट्रवादीत राहूनच करावी लागणार असल्याचा विचार सहाणे यांनी केला असावा, असे सांगण्यात येते.