Sun, May 26, 2019 00:51होमपेज › Nashik › आरक्षण : रामकुंडात महिलांचा जलसमाधीचा प्रयत्न

आरक्षण : रामकुंडात महिलांचा जलसमाधीचा प्रयत्न

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:52AMपंचवटी : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रामकुंड येथील बाणेश्‍वर महादेवाला मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक करून रामकुंडात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी आणि अग्निशमन दल, मनपाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना पाण्याबाहेर काढत ताब्यात घेतले आहे. कायगाव टोका घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने, जलसमाधी घेण्याचा प्रयत्न सुरूच आहे.

दरम्यान, शनिवारी (दि.28) आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरासमोर मराठा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. रामकुंड येथील बाणेश्‍वर महादेवाला साकडे घातल्यास इच्छापूर्ती होत असल्याची श्रद्धा असल्याने कार्यकर्त्या शोभा सोनवणे, मंगला शिंदे, माधवी पाटील, मनोरमा पाटील, रोहिणी दळवी, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, सुजाता जगताप, अरुणा डुकरे यांनी शुक्रवारी बाणेश्‍वर महादेवाला दुग्धाभिषेक केला. अभिषेकानंतर माधवी पाटील, मनोरमा पाटील आणि पूजा धुमाळ यांनी रामकुंडात वाहत्या पाण्यात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि महिला पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी, अग्‍निशमन दलाचे जवान आणि स्थानिक फुलविक्रेत्या महिलांनी त्यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात देत पंचवटी पोलीस ठाण्यात आणले आहे.