Sat, Jan 19, 2019 13:43होमपेज › Nashik › मनमाडला कापूस, चारा भिजला; कांदा पिकाचेही नुकसान

मनमाडला कापूस, चारा भिजला; कांदा पिकाचेही नुकसान

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 05 2017 11:45PM

बुकमार्क करा

मनमाड : वार्ताहर

 ‘ओखी’ वादळाचा परिणाम मनमाड शहर परिसरातही जाणवला आहे. मंगळवारी (दि.5) सकाळी आणि सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले तर हवेत गारठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती.

अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील तयार खळ्यात-मळ्यात उघड्यावर असलेला कांदा तसेच चारा भिजून खराब झाला आहे तर वेचणीला आलेला कापूसही भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. पाऊस आणि दाट धुक्यामुळे रस्त्यावरील काहीही दिसत नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काहींनी तर धाब्यावर वाहने उभी करून धुके कमी होण्याची वाट पाहिली. दोन दिवसांपासून मनमाड शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र, मंगळवारी (दि. 5) सायंकाळी तर चक्क पावसानेच हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.