Fri, Aug 23, 2019 21:09होमपेज › Nashik › बिबट्याने घेतला बालकाचा बळी

बिबट्याने घेतला बालकाचा बळी

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:36PM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या नरभक्षक बिबट्याने बुधवारी रात्री साकूर (ता. मालेगाव) येथील बालकाला लक्ष केले. बिबट्याने आतापर्यंत बळी घेतलेल्यांची संख्या सातवर पोहोचली असून, त्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी वनविभागाने शार्पशूटर पाचारण केले आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कळवाडी-साकूर शिवारात तळ ठोकून असून, ते बिबट्याचा शोध घेत आहेत.

साकूर फाटा शिवारातील आजोळी रतन शंकर बागूल यांच्याकडे कुणाल प्रकाश अहिरे (7) आला होता. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेकोटीजवळ शेकत असताना शेतशिवारातून आलेल्या बिबट्याने त्याला अलगद उचलून घेत धूम ठोकली. आईने आरडाओरड केल्याने नातेवाइकांसह ग्रामस्थांनी बालकाचा शोध घेण्यास प्रारंभ केला. तासाभरातील शोधमोहिमेनंतर झोपडीपासून 100 मीटर अंतरावर बालकाचे धड सापडले. तर काही अंतरावर शिर सापडले. घटनेची खबर मिळाल्यानंतर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्यासह वन अधिकारी हे पथकासह साकूरमध्ये दाखल झाले. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यात सहा जणांचा बळी घेणार्‍या बिबट्याच्या मागावर असलेले पथक उंबरखेड परिसरात दाखल होते. त्यांनाही माहिती मिळाल्यानंतर तेदेखील पिळकोसमार्गे साकूरकडे रवाना झाले. रात्री उशिरा नरभक्षक बिबट्याची शोधमोहीम सुरू झाली. त्यासाठी बागलाण, चांदगाव, देवळा, कळवण, मालेगाव तालुक्यातील वन विभागाच्या कर्मचार्‍यांना पाचारण केले गेले. परंतु बिबट्या सापडला नाही. 

सकाळी अहिरे कुटुंबीयांना बिबट्याला ठार मारल्याशिवाय अंत्यविधी करण्यास नकार दिला. भयभीत ग्रामस्थांनीही आंदोलन केले. तहसीलदार आवळकंठे यांच्यासह वन अधिकार्‍यांनी आप्तेष्ट व ग्रामस्थांशी चर्चा करून बिबट्याला पकडण्यासाठी दहा पिंजरे लावले असून, जोपर्यंत त्याचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत मोहीम सुरू राहील, असे आश्‍वासन दिल्यानंतर आप्तेष्टांनी बालकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.