मालेगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीला सहा महिने उलटूनही पक्षांतर्गत रस्सीखेचीमुळे रखडलेली स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया अखेर गुरुवारी (दि.14) अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण झाली. सत्ताधारी काँग्रेसतर्फे ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अब्दुल मालिक मो. युनूस, विरोधी मालेगाव महागठबंधन आघाडीतर्फे माजी नगरसेवक मो. आमीन मो. फारुक व अॅड. गिरीश बोरसे तर, शिवसेनेतर्फे भीमा भडांगे यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाली.
निवडणुकीनंतर सत्तास्थापनेपाठोपाठ साधारण महिनाभरात पक्ष व गटांच्या तौलनिक संख्याबळानुसार पाच नामनिर्देशित सदस्य निवडीची प्रक्रिया होणे अपेक्षित होते. परंतु, इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करताना सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना युती, तसेच विरोधी महागठबंधन आघाडीचा कस लागला. पदाधिकार्यांबरोबरच नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा स्वीकृत नगरसेवक पदासाठी आग्रह राहिल्याने तो नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला. त्यातून अखेर नावे निश्चित होऊन गुरुवारी विशेष महासभा बोलविण्यात आली. दुपारी 4 वाजता सभेच्या कामकाजास प्रारंभ झाला. नगरसचिव राजेश धसे यांनी पक्ष व आघाडीकडून सादर प्रस्तावांची छाननी करत आयुक्त कार्यालयाने शिफारस केलेल्या चारही उमेदवारांच्या नावांचे वाचन केले. महापौर शेख रशीद यांनी सर्वप्रथम काँग्रेसतर्फे अब्दुल मलिक यांच्या नावाला मान्यता दिली. त्यानंतर महागठबंधनकडून सादर मो. आमीन व अॅड. बोरसे यांचे नाव योग्य आहे का, अशी पक्षाचे गटनेते बुलंद एकबाल यांना विचारणा केली. ते योग्य असल्याने दोन्हींच्या नावाला मान्यता प्रदान करण्यात आली. अखेर शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर यांच्या होकारार्थी इशार्याने भीमा भडांगेंचे नावही जाहीर केले गेले.
काँग्रेसच्या कोट्यातील शिल्लक एक नामनिर्देशित सदस्य नंतर सुचविला जाईल, असे जाहीर करत महापौरांनी सभेचा समारोप केला. अवघ्या पाच मिनिटांत सभेचे कामकाज होऊन नवनियुक्त स्वीकृत सदस्यांचा महापौर शेख रशीद, उपमहापौर सखाराम घोडके, प्रशासन उपायुक्त डॉ. प्रदीप पाठारे आदींनी सत्कार केला. सदस्य नियुक्तीपूर्वीच मनपा मुख्यालयाबाहेर एमआयएमच्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी करत विजयोत्सव केला.