Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Nashik › कृउबा सभापती हिरे यांच्यावरील अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर

कृउबा सभापती हिरे यांच्यावरील अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर

Published On: Dec 19 2017 2:04AM | Last Updated: Dec 18 2017 10:45PM

बुकमार्क करा

मालेगाव : वार्ताहर

येथील कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर बाजार समितीच्या 17 संचालकांनी आणलेला अविश्‍वास प्रस्ताव एक विरुध्द 17 मतांनी मंजूर झाला. 

प्रातांधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या संचालक मंडळाची विशेष बैठक सोमवारी (दि.18) बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी सभापती हिरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. प्रारंभी प्रांत मोरे यांनी सभापती हिरे यांच्यावर अविश्‍वास ठरावादाखल संचालकांनी दिलेली कारणे सांगितली. हिरे यांनी पदाचा गैरवापर करत मुख्य बाजार आवारात आडते असोसिएशनला कार्यालयासाठी बेकायदेशीररित्या जागा उपलब्ध करून दिली, कृषी पणन मंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड थकविली, संचालक व सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानीपणे कारभार केला, बाजार समितीच्या सभांमधील विषय पत्रिकेवरील विषयांची चर्चा न करता मनमानी पद्धतीने अन्य विषयांची इतिवृत्तात नोंद करून ठराव केले, संचालकांनी विषयपत्रिकेतील विषय, ठरावाला विरोध केला तरी त्याला न जुमानता हुकूमशाही पद्धतीने ठराव लिहून घेतल्याने त्यांच्यावर संचालकांनी अविश्‍वास आणल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. यावर संचालकांना चर्चा करायची असल्यास ती करण्याची सुचना प्रांत मोरे यांनी केली. संचालकांनी चर्चेस नकार दिला. तर सभापती हिरे यांनी अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी ठेवलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. यानंतर मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने पहिल्यांदा हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी उपसभापती सुनील देवरे यांच्यासह संचालक डॉ. अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव, पुंजाराम धुमाळ, राजाभाऊ खेमणार, संजय निकम, राजेंद्र जाधव, अमोल हिरे, गोविंद खैरनार, सोजाबाई पवार, बबीता कासवे, गोरख पवार, सुमन निकम, संग्राम बच्छाव, संजय घोडके, शेख फकिरा अहमद शेख सादीक व वसंत कौर आदी 17 संचालकांनी हात उंचावून मतदान केले. तर ठरावाच्या विरोधात केवळ सभापती हिरे यांनी हात उंचावत मतदान केले. 18 पैकी 17 संचालकांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याची घोषणा मोरे यांनी केली. अशोक देसले उपस्थित होते.