Sat, Feb 23, 2019 16:24होमपेज › Nashik › मालेगावातील अस्वच्छतेप्रश्‍नी  काँग्रेस नगरसेवकाचे धरणे 

मालेगावातील अस्वच्छतेप्रश्‍नी  काँग्रेस नगरसेवकाचे धरणे 

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 12:01AM

बुकमार्क करा
मालेगाव : प्रतिनिधी

शहरातून दैनंदिन कचरा उचलण्यात येत नाही. जंतुनाशक फवारणी होत नाही. वेळोवेळी तक्रारी करूनदेखील उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक असलम अन्सारी यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

शहराचा विस्तार आणि हद्दवाढ लक्षात घेता महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडे पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नाहीत. सफाई, ड्रेनेज, झाडू कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर वारसांना त्वरित नेमणूक दिली जात नाही. मानधन व ठेका पद्धतीने मजूर घेण्यात येतात. ते समाधानकारक काम करत नसल्याने शहर अस्वच्छतेचा प्रश्‍न जैसे थे राहतो. वॉर्ड क्रमांक 19 मध्ये अनेक महिन्यांपासून सफाई कामगार, ड्रेनेज कामगार, मुकादम नसल्याने नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे रोगराई पसरून नागरी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रशासन योग्य प्रकारे जबाबदारी निभावत नसल्याचा आरोप करत नगरसेवक अन्सारी यांनी शनिवारी धरणे आंदोलन केले.

प्रशासनाने दि. 8 पर्यंत वॉर्डातील संपूर्ण स्वच्छता करावी. सफाई, ड्रेनेज कामगार उपलब्ध करून देत जंतुनाशक फवारणी करावी. कचरा उचलला जावा. अन्यथा, दि. 9  रोजी मनपा आयुक्‍तांच्या दालनात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.