Tue, Jun 18, 2019 20:17होमपेज › Nashik › अखेर निसर्गाकडूनच ‘मोसम’ स्वच्छता

अखेर निसर्गाकडूनच ‘मोसम’ स्वच्छता

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:09AMमालेगाव : सुदर्शन पगार

शहरभरातील गटारी व नाल्यांमधून सांडपाण्याबरोबर वाहून येणार्‍या कचर्‍यामुळे गटारगंगा झालेल्या मोसम नदीपात्राची अखेर निसर्गानेच स्वच्छता केली. सुमारे 700 ते 800 टन कचर्‍याच्या अडथळ्यांमुळे प्रदूषक घटकांचे डबके बनलेले नदीपात्र दीड तासांत पूरपाण्याने खळखळून परिसरातील दुर्गंधी हद्दपार झाली. परंतू, अनारोग्याचा हा मलिदा थेट शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गिरणा धरणाकडे झेपावल्याने त्याविषयी अनेकांनी चिंता व्यक्त केली.

गतवर्षी साधारण दोन - तीन दिवसच मोसम नदीला पूरपाणी गेले होते. त्यातही जोर नसल्याने नदीपात्रात ठोस बनलेला प्लास्टिक कचरा जैसे राहिला होता. त्यात वर्षभरात भर पडल्याने सामान्य रुग्णालय, महापालिका मुख्यालय ते अल्लमा एकबाल पूलाच्या पुढेपर्यंत मोसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा थर साचला. महसूल, पोलिस आणि महापालिका प्रशासनाने मध्यंतरीच्या काळात स्वच्छता अभियान राबवून शहराबरोबर नदी एका दिवसात स्वच्छ करण्याचा भीम पराक्रम केला. त्यात विविध शाळांतील विद्याथी, काही सामाजिक संघटना आणि जागरुक नागरिकांनीच सहभाग घेतला. 

बहुसंख्य मालेगावकर मात्र प्रत्येक मोहिमेत बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने अभियान ‘फोटोसेशन’पुरतेच मर्यादीत राहिले. ग्रामविकास  राज्यमंत्री दादा भुसे यांनीदेखील युवासेना आणि विविध शासकीय विभागांच्या श्रमदानातून ‘एक दिवस मोसमसाठी’ हा उपक्रम राबवून मोसम चौपाटी वसविली. त्यावेळी प्रवाही करण्यात आलेली नदीपात्रातील गटार कचर्‍याचा मारा सुरूच राहिल्याने पुन्हा रोखली गेली. गटारी, नाल्यांच्या माध्यमातून सांडपाण्यासह कचरा नदीत येतच राहिल्याने साधारण 700 ते 800 टन कचरा पात्रात साचला असल्याचा अंदाज आहे.

दोन दिवसात मोसम खोर्‍यापासून मालेगावपर्यंत मुसळधार आणि संततधार स्वरुपात पर्जन्यवृष्टी झाली. एकट्या मालेगावमध्ये 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. केळझर, हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन हंगामातील पहिला पूर मोसम नदीला आला. साधारण सहा हजार क्यूसेस पाणी वाहून शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कॅम्प बंधार्‍यापर्यंत पोहोचले. तेथून जवळपास दीड तासांचा घनकचर्‍यांच्या अडथळ्यांची शर्यत पार करत पूरपाणी झांजेश्‍वर मंदिराजवळ गिरणा नदीला मिळाले. पहिले दीड तास अत्यंत दुर्गंधीयुक्त अन् उग्र दर्प असलेले पाणी अनेकांच्या नाकाला झोंबले. कॅम्प बंधार्‍यापर्यंत तपकिरी रंगाचे पाणी तेथून पुढे अत्यंत काळेकुट्ट होऊन झेपावत राहिले. ते नदीपात्रातील अस्वच्छतेचे प्रगतीपुस्तक होऊनच मालेगाव महापालिका मुख्यालयापाठीमागून वाहिल्याचा टोला सामाजिक कार्यकर्त्यांनी लगावला आहे.

दीड ते दोन तासानंतर पूरपाण्याने मूळ तपकिरी रंग घेत दुर्गंधीयुक्त दर्प नाहिसा झाला. पूरपाण्याने शहर हद्दीतील पात्राची स्वच्छता केली असली तरी संपूर्ण कचरा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गिरणा धरणात पोहोचवला आहे. त्याविषयी प्रशासनाबरोबरच शहरवासीयांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे.