Fri, Apr 26, 2019 15:49होमपेज › Nashik › भीमा-कोरेगाव : दोषींवर कारवाईसाठी निवेदन, मोर्चा

भीमा-कोरेगाव : दोषींवर कारवाईसाठी निवेदन, मोर्चा

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:29PM

बुकमार्क करा
मालेगाव : प्रतिनिधी

विजयस्तंभ अभिवादनदिनी भीमा-कोरेगाव येथे दंगल घडविणार्‍या जातीयवादी गुंडांवर त्वरित कारवाई करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी  जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन दिले .

‘रिपाइं’च्या विविध गटांसह भीमसैनिकांनी एकात्मता चौकातून मोर्चा काढत जुन्या तहसीलसमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. त्यानंतर कॅम्प रोडवरील बॅरेकेडिंग टाळून संतप्त युवकांचा जमाव मोसम पूलमार्गे मोतीबाग नाक्यापर्यंत गेला. दुकाने बंद करण्याचा इशारा देत गेलेल्या या गटाच्या घोषणाबाजीमुळे तणावाचे वातावरण तयार झाले होते.

200 वर्षांपूर्वी दलित सैनिकांनी गाजविलेल्या शौर्याचा विजयदिन पुण्यातील भीमा-कोरेगावमध्ये साजरा केला जातो. 1 जानेवारीला त्यासाठी गेलेल्या नागरिकांवर अज्ञातांनी हल्ला चढवून वाहनांची नासधूस केली. एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा ‘रिपाइं’च्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. 

या प्रकरणातील हल्लेखोरांना दोन दिवसात अटक करावी, विजयस्तंभाला कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त पुरवावा, प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अन्यथा, मालेगाव बंद पाळण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष भारत म्हसदे यांनी दिला आहे. भगवान आढाव, राकेश देवरे, किरण पगारे, माजी नगरसेवक राजेश गंगावणे, भारत म्हसदे, रवी पगारे, नितीन झाल्टे आदींनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीला निवेदन सादर केले.  

भीमा-कोरेगावमधील हल्ला नियोजित होता. प्रशासनाने दुर्लक्ष केले तर, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे एकाचा जीव गेला तर, आबालवृद्ध जखमी झाले. त्यास कारणीभूत ठरलेल्यांवर अ‍ॅट्रासिटी दाखल करावी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.