Wed, Jan 29, 2020 23:07होमपेज › Nashik › मालेगावी गॅसचा काळाबाजार

मालेगावी गॅसचा काळाबाजार

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 05 2018 11:54PMमालेगाव : प्रतिनिधी

एकेकाळी रॉकेलच्या काळ्या बाजारासाठी प्रसिद्ध मालेगाव शहरात अनुदानित गॅस सिलिंडरचादेखील काळाबाजार तेजीत आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसीलदारांनी केलेल्या छापेमारीत अनधिकृत सबडीलरच्या माध्यमातून सुरू असलेले गॅस सिलिंडरचे वितरण सापडले. शिवाय उज्ज्वल गॅस योजनेच्या लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली. शहरातील मालेगाव गॅस एजन्सीविषयी तक्रारी अर्ज तहसील कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी शनिवारी दुपारी 3 वाजता तहसीलदार देवरे यांनी पुरवठा निरीक्षकांना सोबत घेत संबंधित गॅस एजन्सीची अचानक पाहणी केली. कॉम्प्युटर प्रिंटेड स्लिपांबरोबरच हाताने पावती नंबर लिहिलेल्या सात स्लिप आढळून आल्या. त्याविषयी असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने सखोल चौकशी आरंभण्यात आली. एका पावतीवर ‘वाजिद मामू’ असे लिहिल्याचे आढळले. त्याला आठ सिलिंडर दिल्याचे सांगण्यात आल्याने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर तहसिलदारांनी आपली ओळख गॅस कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून संपर्क साधला. वाजिद मामूने आपल्याला आजच आठ टाक्या मिळाल्याचे मान्य केले. त्या सिलिंडरमध्ये त्रुटी असल्याने तपासणीसाठी परत करण्याची सूचना केली असता त्याने ते सिलेंडर वितरित झाल्याचे सांगितले. तक्रारीत तथ्य आढळत असल्याचे लक्षात आल्याने भ्रमणध्वनीवरील संभाषण सुरूच ठेऊन एजन्सीतील एकाला सरकारीत वाहनात घेऊन वाजिद मामूचे घर गाठण्यात आले. तेव्हा घरात संशयास्पद हालचालींना वेग आला होता.

हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत गॅसचे प्रत्येकी दोन असे चार गॅस सिलिंडर घरात सापडले. मोठे एकत्र कुटुंब असल्याने स्वत:चेच सर्व सिलिंडर असल्याचे सांगणार्‍या वाजिदच्या दुचाकीला लावलेल्या पिशवीत साई गॅस एजन्सीच्या नावाने उज्ज्वल गॅस योजनेच्या लाभार्थ्यांतेही कार्ड सापडले. त्याशिवाय 70 गॅसकार्ड, आधारकार्डसह नवीन गॅस जोडणीसाठीचे जवळपास 100 प्रकरण आणि एकूणच व्यवहाराची माहिती लिहिलेली डायरी सापडली. मुख्य गॅस एजन्सीने अनधिकृतपणे सब डिलर नेमून गॅसचा काळाबाजार चालविल्याच्या संशयातून सर्व कार्ड व सिलिंडर जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. प्राथमिक स्तरावर अनधिकृतपणे गॅस वितरण करणार्‍या जाविद मामूवर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.