Thu, Apr 25, 2019 23:51होमपेज › Nashik › घरबसल्या करा मतदार नोंदणी, दुरुस्ती

घरबसल्या करा मतदार नोंदणी, दुरुस्ती

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 1:35AMनाशिक : गौरव जोशी

केंद्रीय निवडणूक आयोग आता अधिक लोकाभिमुख झाला असून, आयोगाने त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे अद्ययावत सॉफ्टवेअर बुधवारपासून (दि.16) सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे नागरिकांना घरबसल्या मतदारयादीत नाव नोंदणी, दुरुस्तीपासून ते बीएलओ तसेच अन्य सर्व माहिती अवघ्या काही मिनिटांमध्ये उपलब्ध होणार आहे. 

गतिमान व पेपरलेस कामकाजासाठी आयोगाने गेल्या काही वर्षांपासून पावले टाकायला सुरुवात केली आहे. आयोगाने नुकतेच त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून घेतले आहेत. या बदलांबरोबर काम अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्यावर आयोगाचा भर आहे. दरम्यान, नव्या बदलानुसार आयोगाने सॉफ्टवेअरमध्ये नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल लागू केला आहेे. यामध्ये नवीन नोंदणी करणे तसेच नावात दुरुस्तीबरोबर कोणत्या मतदान केंद्रावर नाव याची माहिती आयोगाकडून मिळवता येणार आहे.

सॉफ्टवेअरमध्ये दिव्यांग तसेच व्हीहीआयपींसाठीचा वेगळा कॉलम देण्यात आला आहे. मतदार नोंदणी अधिकार्‍याने त्याबाबतची माहिती त्यात भरणे आवश्यक आहे. यामुळे मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रनिहाय किती दिव्यांग आहे, याची माहिती एका क्‍लिकवर अधिकार्‍यांना मिळणे शक्य होईल. त्यानुसार संबंधित केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्प व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. व्हीव्हीआयपी कोट्यात आजी-माजी मंत्री, खासदार-आमदार, महापौर यासह भारतरत्न व तसेच इतर महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त व्यक्‍ती, साहित्यिक, नामवंत खेळाडू आदींची नावे समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतील अधिकार्‍यांनी दिली.

मतदार क्रमांक तत्काळ मिळणार

नवमतदाराचा अर्ज भरताना सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी अधिकार्‍याने ईपीक (इलेक्ट्रॉनिक मतदार क्रमांक) नोंदणीवर क्‍लिक करणे आवश्यक आहे. त्याशिवाय अर्ज वैध ठरणार नाही. ईपीकवर क्‍लिक केल्यावर तत्काळ नवमतदाराचा दहा अंकी मतदार क्रमांक दिला जाईल. दरम्यान, अर्ज भरल्यानंतर तो कोणत्या टप्प्यावर आहे, याचा मेसेज मतदाराला एसएमएस अथवा ई-मेलद्वारे वेळोवेळी कळविला जाईल. त्यामुळे मतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट झाले आहे की नाही याची माहिती उपलब्ध होणार आहे.