सिडको : प्रतिनिधी
चोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल पावणेतीन लाख रुपयांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. अंबड पोलीस ठाणे हद्दीत मोबाइल चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास संजीवनगर येथे एका चहाच्या टपरीसमोर एक इसम मोबाइल विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गुन्हे शोध पथकाने या ठिकाणी जाऊन संशयित आरोपी चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (27) यास ताब्यात घेतले. त्याने संजीवनगर, त्रिमूर्ती चौक, एक्सलो पॉइंट, गर्दीच्या ठिकाणाहून मोबाइल चोरीची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण 27 मोबाइल हस्तगत करण्यात आले. मोबाइल चोरीसंदर्भात तक्रारदारांनी अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी केला आहे. उपनिरीक्षक तुषार चव्हाण, हवालदार भास्कर मल्ले, दुष्यंत जोपाळे, अविनाश देवरे, नितीन फुलमाळी यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.