Sat, Aug 24, 2019 23:26होमपेज › Nashik › कमी दराने काम घेणारे ठेकेदार कचाट्यात

कमी दराने काम घेणारे ठेकेदार कचाट्यात

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

कमी दराने कामे घेऊन ते वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणार्‍या सदस्यांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली तेव्हा कमी किमतीत ठेकेदारांना परवडते तरी कसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी कामांना भेटी देतात की नाही आदी मुद्दे प्रकाशात आले. चर्चेअंती गुणवत्ता तपासल्याशिवाय ठेकेदारांना पुढील कामे देऊ नये, अशी जोरदार मागणीही करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज झाले. कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येते. निविदा भरतानाही लॉबिंग करण्यात येते. कामे पदरात पाडून घेण्यासाठी अधिकाधिक कमी दराने निविदा भरल्या जातात. पण, कमी दरात निविदा भरून काम मिळाल्यावर मात्र ते सुरूच केले जात नसल्याकडे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी लक्ष वेधले. ज्या ठेकेदारांनी कमी दराने कामे घेतली, त्यांच्या कामांची तपासणी केली आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. सदस्य संजय बनकर यांनीही हीच री ओढली. उपाध्यक्षा नयना गावित यांनी मागील देयकांवरच निधी खर्च होणार असल्याने नवीन कामे घेता येणार नाही, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कामे न करणार्‍या ठेकेदारांना निदान वर्षभर तरी बंदी घालता येईल का, यादृष्टीनेही विचार केला जावा, असेही त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामांची पाहणी करणे आवश्यक असताना संबंधितांनी भेटी दिल्या नसल्याचेच पुढे आले.काही ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने जनतेच्या रोषाला सदस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी सदस्यांचे लेखीपत्र घेतल्याशिवाय ठेकेदारांना अनामत रक्कम परत देऊ नये, असा ठराव करण्यात आला.