Thu, Jun 27, 2019 09:53होमपेज › Nashik › खापराळे गावात बिबट्याचा थरार

खापराळे गावात बिबट्याचा थरार

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:29PMसिन्‍नर : प्रतिनिधी

तालुक्यातील खापराळे गावात मंगळवारी (दि.6) सकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याचा थरार ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. बिबट्याच्या हल्ल्यात महिला किरकोळ जखमी झाली. पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले.   खापराळेमध्ये सकाळी बिबट्या पाण्याच्या शोधात दादा विठोबा बिन्नर यांच्या कुडाच्या गोठ्यात शिरला. भागुबाई बिन्नर या नेहमीप्रमाणे गोठ्याची साफसफाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.

या हल्ल्यात बिन्नर किरकोळ जखमी झाल्या. जखमी अवस्थेत बाहेर येऊन बिन्नर यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. दुसरीकडे गोठ्यामध्ये बांधलेल्या तीन  म्हशींनी बिबट्याला पाहताच हंबरडा फोडण्यास सुरूवात केली. एक म्हैस तर दावं तोडून गोठ्याबाहेर पडली. या गोंधळात प्रसंगावधान राखून वनमजूर बाबूराव सदगीर यांच्यासह काही ग्रामस्थांनी धाडसाने गोठ्याचा दरवाजा बाहेरुन बंद केला. त्यामुळे बिबट्या गोठ्यात कोंडला गेला. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. गोठ्यात बिबट्या कोंडल्याची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. 

सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्यासह वनपाल पी. के. सरोदे, ए. के. लोंढे, शरद थोरात, के. आर. इरकर, पी. जी. बिन्नर आदी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुरू झाले रेसक्यू ऑपरेशन. गोठ्याच्या दरवाजाच्या दिशेने पिंजरा लावण्यात आला. पिंजर्‍यांचे व गोठ्याचे दार उघडण्यात आले. बिबट्या एका कोपर्‍यात लपून बसलेला होता. वनकर्मचार्‍यांनी दुसर्‍या बाजूला घुंगरांचा आवाज केला. बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा असल्याने बिबट्या अलगद पिंजर्‍यात अडकला. जेरबंद होण्याआधी बिबट्याने गोठ्यातील इतर दोन म्हशींवरदेखील हल्ला केला. यामध्ये दोन्ही म्हशींच्या डोळ्याला जखम झाली. जेरबंद बिबट्याला पिंजर्‍यासह मोहदरी येथील वनोद्यानात नेण्यात आले.  पकडलेला बिबट्या पाच वर्षाचा असून, त्याला लवकरच त्याला निर्सगाच्या सान्‍निध्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्रपाल बोडके यांनी दिली.