Wed, Mar 20, 2019 09:14होमपेज › Nashik › विहिरीत पडलेल्या बिबट्याने ठोकली धूम!

विहिरीत पडलेल्या बिबट्याने ठोकली धूम!

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 23 2017 10:38PM

बुकमार्क करा

नाशिकरोड : वार्ताहर

नाशिक सहकारी साखर कारखाना परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात वनविभाग व नाशिकरोड पोलिसांना यश आले. रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत बिबट्याला वाचण्यासाठी थरार सुरू होता. विहिरीतून बाहेर येताच बिबट्याने शेजारच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक सहकारी साखर कारखान्याजवळील आडके यांच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी पडली होती. त्यामुळे विहिरीच्या काठावर तिचा साथीदार बिबट्या डरकाळ्या फोडत होता. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांना निदर्शनाला आली असता, त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे आणि वनविभागाला ही माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांसहवनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत शिडी टाकण्यात आली. काही वेळातच बिबट्या शिडीच्या सहाय्याने बाहेर पडला आणि डरकाळी फोडत येथील उसाच्या शेतात धूम ठोकली. विहिरीमधून बाहेर आलेला बिबट्या मादी जातीचा असून, तिच्या सोबत दोन नर बिबटे असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली.

या ठिकाणी शनिवारी दिवसभर बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनपाल रवींद्र सोनार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनरक्षक उत्तम पाटील, विजय पाटील, विठ्ठल तांबडी, पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.