Wed, Apr 01, 2020 06:19



होमपेज › Nashik › लासलगाव जळीतकांडातील पीडिताचा मृत्यू 

लासलगाव जळीतकांडातील पीडिताचा मृत्यू 

Last Updated: Feb 22 2020 12:45PM




नाशिक : पुढारी ऑनलाईन 

येथील लासलगाव जळीतकांडातील पीडित महिलेचा मुंबईत उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेली पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. मुंबईतील मसिना रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पीडिताचा  मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. पीडिताच्या नातेवाईकांनी तिच्यावर लासलगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले. दरम्यान आरोपी रामेश्वर भागवतवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लासलगाव येथील बस स्थानकावर शनिवारी (दि.१५) दुपारी कथित पती व विधवेच्या घरच्यांना झालेले दुसरे लग्न मान्य नसल्याच्या कारणाच्या वादातून झटापटीत पीडित महिला 67 टक्के भाजल्याची घटना घडली. लासलगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवतह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  यात पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक व पेट्रोल देणाऱ्या कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपी रामेश्वरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

प्रचंड पोलिस बंदोबस्त

लासलगाव येथील जळीत प्रकरणी पीडितेचा आज निधन झाल्याने तिचे अंत्यसंस्कार लासलगाव येथील अमरधाममध्ये करण्यात आले. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त अमरधाम मध्ये पीडिताच्या आणि आरोपी भागवत याच्या घराजवळ तर विंचूर चौफुली वर प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मायेचे छत्र हरपले

दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर आज या चिमुकल्याच्या आईचेही दुर्दैवी निधन झाल्याने या ३ लहान चिमुकल्या मुलांचे छत्र हरपले आहे. आईचा मृतदेह पाहून लहान चिमुकले रडून-रडून हैराण झाले होते. एकूणच लासलगाव येथील अमरधाम मधील परिस्थिती अत्यंत भेदरलेली असून मन हेलकावून टाकणारी दृश्य दिसत होते. गेल्या सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या पिडितेची प्राणज्योत मावळली. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी पीडितावर अंत्यसंस्कार येथील अमरधाममध्ये करण्यात आले.