Thu, Apr 25, 2019 13:41होमपेज › Nashik › चाकूहल्ला करून लूटमार; तिघे जण ताब्यात

चाकूहल्ला करून लूटमार; तिघे जण ताब्यात

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 10:26PM

बुकमार्क करा

नाशिकरोड : वार्ताहर 

रात्रीच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍या व्यक्‍तींना अडवून त्यांच्यावर चॉपरने वार करून  लूटमार करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संशयितांमध्ये दोघे अल्पवयीन असून, त्यांनी सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. अल्पवयीन असल्याने आपल्यावर कठोर कारवाई होणार नाही, असे गृहीत धरून संशयितांनी हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

सूरजकुमार श्रीपुरारी सिंह (19, रा. कामटवाडा, सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.4) पोलीस कोठडी सुनावली आहे. सूरजकुमारसह इतर दोघा अल्पवयीन संशयितांनी मिळून सहा जणांवर चॉपरने हल्ला करून लूटमार केल्याची कबुली दिली आहे. संशयितांकडून सहा मोबाइल, चॉपर, गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी, चांदीची चेन असा सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. 

शनिवारी (दि.25) चेहडी शिवारातून  ज्ञानेश्‍वर कुमावत (19) हा युवक रात्रीच्या सुमारास घराकडे परतत असताना अ‍ॅक्टिव्हावरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यास अडवले. संशयितांनी ज्ञानेश्‍वरवर चॉपरने वार करून जखमी करीत त्याच्याकडील रोकड, चांदीची चेन असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर काही मिनिटांच्या अंतराने या संशयितांनी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एकावर वार करून लूटमार केली होती. गुन्ह्याची पद्धत आणि संशयितांचे वर्णन एकच असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. संशयितांनी वापरलेल्या दुचाकीचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर तो एमएच 15 ईटी 2652 असा होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून या दुचाकीवरून फिरणार्‍या संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी लूटमारीची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सूरज बिजली, सहायक उपनिरीक्षक देशमुख, गायकवाड, उत्तम दळवी, मिलिंद पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.