Tue, Aug 20, 2019 04:35होमपेज › Nashik › आम्हाला खानदेश नको; विकास हवा; एकनाथ खडसेंचा टोला

आम्हाला खानदेश नको; विकास हवा; एकनाथ खडसेंचा टोला

Published On: Mar 03 2018 2:06AM | Last Updated: Mar 03 2018 2:06AMमालेगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने विदर्भ वेगळे राज्य करू, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात. विदर्भाला वेळोवेळी मुख्यमंत्रिपद लाभले. दुसरीकडे स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही उत्तर महाराष्ट्राला आजतागायत ही संधी मिळालेली नाही. त्यातून खानदेश पिछाडीवर जात असला तरी आम्हाला वेगळे होण्याची इच्छा नाही. मात्र, विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी संघर्ष करण्यात काही गैर नाही. सार्वजनिक हिताच्या मागण्यांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र लढल्याशिवाय गत्यंतर नाही. ही अस्तित्वाची लढाई माना, स्वस्थ बसू नका, असे सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

काँग्रेस नेते प्रसाद हिरे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त भायगाव रस्त्यावरील राजीव गांधी तंत्रशिक्षण संकुलाच्या प्रांगणात शुक्रवारी (दि.2) दुपारी 12 वाजता आयोजित शेतकरी मेळाव्यात  ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  खडसे यांच्या भाषणातून खानदेशला नेतृत्वापासून डावलल्याचा तसेच, पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाविषयी नाराजी संयमी शब्दात व्यक्त झाली. कर्मवीर भाऊसाहेब हिरेंपासून रोहिदास पाटील हे सर्व सर्वार्थाने पात्र नेते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, अथवा त्यांना डावलले गेले, हे खानदेशचे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या. मात्र, त्यांनाही राज्यात संधी दिली गेली नाही.  निवडणुकीच्या बोहल्यावर एकमेकांना शह-काटशह देण्यामुळेच उत्तर महाराष्ट्र मागे पडल्याचा मुद्दा खडसेंनी मांडला.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक सोडले तर जे काही आहे ते भूमिपुत्रांच्या मेहनतीचे आहे. उर्वरित भागाच्या विकासासाठी अपूर्ण प्रकल्प तत्काळ पूर्ण करावे लागतील. नार-पार, कोकणातील पाणी वळविल्याशिवाय पाणीप्रश्‍न अन् पर्यायाने कृषी सिंचनाचा विषय निकाली निघणार नाही. सुदैवाने नाशिकचे पालकमंत्री राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत. केंद्रात नितीन गडकरींचे पाणी नियोजन आहे. त्यांच्याकडे निश्‍चितपणे पाठपुरावा केला जाईल. जनतेनेही पुढे जाऊन सरकारला जाब विचारला पाहिजे, हक्कासाठी लढा दिला नाही तर डोळ्यासमोरून पाणी वाहून जाईल, अशी भीतीही खडसे यांनी वर्तविली.

तत्पूर्वी, राज्यमंत्री दादा भुसे यांनी इतर वक्त्यांच्या भाषणातील धागा पकडून सध्या शेतकरी अडचणीत असल्याची वस्तुस्थिती आहे. पण ती मागील तीन-चार वर्षांत झालेली नाही. पहिला टप्पा म्हणून 34 हजार कोटींची कर्जमाफीचे समाधान मानू. परंतु, शिवसैनिक म्हणून तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सरसकट कर्जमाफीची मागणी आहे. शेतकर्‍यांच्या भावना शासन दरबारी मांडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. मामको बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीकांत वाघ संपादित ‘सर्वसामान्यांचे बापू’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रमुख अतिथींनी प्रसाद हिरे यांचे अभीष्टचिंतन केले. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे ‘शेतकर्‍यांची व्यथा’ या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर इंदिरा हिरे, प्रसाद हिरे अभीष्टचिंतन सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष हरिलाल अस्मर, आमदार डॉ. सुधीर तांबे, हेमतला पाटील, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, माजी आमदार अनिल आहेर, दिलीप बोरसे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, मधुकर हिरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक पवार, लकी गील, उपमहापौर सखाराम घोडके, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, देवराज गरुड, माणिकराव बोरस्ते, राघोनाना अहिरे, शांताराम लाठर, माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

नेत्यांची फटकेबाजी अन् गुदगुल्या

मेळाव्यात नेत्यांची सूचक फटकेबाजी अन् गुदगुल्या चर्चेचा विषय ठरली. सर्वप्रथम मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी प्रसादबापूंना अद्याप योग्य न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी माझ्याप्रमाणे ट्रॅक सोडला नसता तर आज वेगळ्या ठिकाणी असते, असे राजकीय मत नोंदविले तेव्हा राज्यमंत्री भुसेंची नजर उंचावली. तेव्हा हशा पिकला. तशी सर्वच पक्षांचे तिकीट बापूंच्या खिशात आहेत, निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. भविष्यात आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहू. त्यांनीही आमच्या पाठीवर हात ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आगामी उमेदवारीचे संकेत स्पष्ट केले. त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या राज्यमंत्री भुसे यांनी प्रसादबापूंना बाजार समितीचे सभापतिपद साजेसे नव्हतेच, त्यांना योग्य पदावर पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत. त्यामुळेच भगव्या शालीत स्वागत केल्याचे सांगितले. जनताजनार्दनाची साथ आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे राज्यमंत्रिपद लाभले. जनता जेव्हा सांगेल तेव्हा थांबू, असे म्हणत व्यासपीठावरून आलेला तडजोडीचा चेंडू टोलावला.

मग सरकारचे कौतुक का नाही?
शेतकरी कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय झाला. 30 हजार कोटी ही लहान रक्कम नाही. तरी सरकारचे कौतुक का नाही? समाधान का नाही? असा मुद्दा उपस्थित करत खडसेंनी शेतकर्‍यांना अजून अपेक्षा असल्याचे म्हटले. सध्या मी विरोधातही नाही आणि सत्तेतही. तरी येत्या अधिवेशनात शेतकर्‍यांचा विषय मांडणार असल्याची ग्वाही खडसेंनी दिली. 100 टक्के कर्जमुक्ती दिली तरी आत्महत्या थांबण्याची कोणी गॅरंटी देऊ शकणार नाही. हमीभावाचा विषय कठीण. उत्पादन खर्चावर जरी भाव दिला तरी उत्पन्न कमी झाले तर परवडणार नाही. शाश्‍वत शेतीसारखे पर्याय निर्माण केले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी नोंदवले.