Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Nashik › पाणीच पाणी अन् वाट पाहणार्‍या व्याकूळ नजरा

पाणीच पाणी अन् वाट पाहणार्‍या व्याकूळ नजरा

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:57AMनाशिक : सुदीप गुजराथी

नजर जाईल तिथे पाणीच पाणी... लोक जीव वाचविण्यासाठी घरांच्या दुसर्‍या-तिसर्‍या मजल्यावर जाऊन बसलेले... ना खायला अन्न, ना प्यायला स्वच्छ पाणी... चोहीकडे पाणी, पण पिता येत नाही... आकाशातून पडणार्‍या अन्नाच्या पाकिटांची वाट भिरभिरत्या नजरेने पाहत राहायची... वीज नाही की मोबाइल नेटवर्क नाही.. सगळीकडे भयाण शांतता आणि तिला चिरत जाणारा पाण्याचा अंगावर काटा आणणारा आवाज... 

- केरळमधील सध्याच्या पूरस्थितीचा हा भीषण ‘आँखो देखा हाल.’ मूळ नाशिककर असलेले आपत्ती व्यवस्थापनातील एक तज्ज्ञ स्वयंप्रेरणेने एका स्वयंसेवी संस्थेबरोबर केरळमध्ये मदतीसाठी धावले. त्यांनी कथन केलेली परिस्थिती थरकाप उडविणारी आहे. ‘लोकांच्या मदतीसाठी स्वत:हून गेलो होतो, आपल्याला प्रसिद्धी नको’ असे विनम्रपणे नमूद करणार्‍या या सद्गृहस्थांनी सांगितले की, ‘मी रविवारी सकाळी रेल्वेने एर्नाकुलमला पोहोचलो. तेथून पुढे गाड्या बंद होत्या. केरळमध्ये मदतकार्य करणार्‍या सामाजिक संस्थांच्या गाड्या धावत होत्या. त्यांतून वाटेतले पाणी टाळत, डोंगराच्या कडेकडेने, कधी कर्नाटक, तर कधी केरळमधून प्रवास करीत पलक्कडपर्यंत पोहोचलो. आमच्या संस्थेतर्फे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून 30 डॉक्टरांचे पथक 10 हजार लिटर पाणी, 3 क्विंटल औषधे घेऊन तेथे पोहोचले होते. आम्ही तेथील आर्मी, नेव्ही, एनडीआरफच्या जवानांशी चर्चा केली. नकाशे पाहून पूरग्रस्तांपर्यंत कसे पोहोचता येईल, हे समजावून घेतले आणि पलक्कडच्या आतल्या भागात निघालो. कितीतरी वेळ मी स्वत: कंबरेइतक्या पाण्यात होतो.