होमपेज › Nashik › पं. स. सभापतींनी घेतला गुरुजींचा ‘तास’!

पं. स. सभापतींनी घेतला गुरुजींचा ‘तास’!

Published On: Mar 01 2018 11:03PM | Last Updated: Mar 01 2018 10:44PMकाकासाहेबनगर : वार्ताहर

निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील जिल्हा परिषद पालखेड शाळेत निफाड पंचायत समिती सभापती पंडित आहेर यांनी पालखेड गटातील शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात सर्व उपस्थित अधिकारी व शिक्षकांचा आहेर यांनी दिवसभर समाचार घेतला. कामात सुधारणा करण्याची सक्त ताकीद देत इंग्रजी माध्यमांशी स्पर्धा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शैक्षणिक कामकाज, पोषण आहार, शाळादुरुस्ती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिक्षकांची कामाची पद्धत आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संजय चव्हाण, केंद्रप्रमुख भास्कर बोरसे, शालेय पोषण आहार अधीक्षक बैसाने आदी उपस्थित होते.

शिक्षकांशी संवाद साधताना सभापती आहेर म्हणाले, समाजाला दिशा देण्याचे काम करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यांनी आपल्या कामकाजात तत्पर व अद्ययावत असले पाहिजे. इंग्रजी माध्यमांशी स्पर्धा असून, भविष्यात जर जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी यावे असे वाटत असेल, तर काळानुरूप आपण बदल केला पाहिजे. शिक्षकांनी शाळेत वेळेवर उपस्थित राहावे. उशिरा येणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच शिक्षकांनी आपापसांत वाद न करता सामंजस्याने राहावे. तीन वर्षार्ंपासूनचे सर्व शाळांचे आर्थिक अभिलेखे यावेळी सभापतींनी तपासले. यावेळी तीन शाळांच्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळून आली. त्यांना समज देऊन सदर शाळेने कागदपत्रांची पूर्तता करून पंचायत समिती निफाड येेथे पुन्हा तपासणीसाठी घेऊन येण्यास सांगण्यात आले. खैरे वस्तीशाळेमध्ये बांधकामांमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे या शाळेच्या बांधकामाचे मूल्यमापन इंजिनिअरमार्फत पुन्हा करण्यात येण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. नवीन शैक्षणिक वर्षात ज्या शाळांचा पट वाढलेला असेल त्या शाळांना आहेर यांनी पंचायत समितीमार्फत अकरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.